इगतपुरीचे रेल्वे हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:14 AM2021-04-24T04:14:48+5:302021-04-24T04:14:48+5:30
इगतपुरी हे मध्यरेल्वेचे महत्त्वाचे घाटमाथ्यावर वसलेले स्टेशन आहे. भारतात रेल्वे सुरू झाली त्यावेळी घाटात कोणताही अपघात झाला ...
इगतपुरी हे मध्यरेल्वेचे महत्त्वाचे घाटमाथ्यावर वसलेले स्टेशन आहे. भारतात रेल्वे सुरू झाली त्यावेळी घाटात कोणताही अपघात झाला तर जवळ हॉस्पिटल हवे, या उद्देशाने इगतपुरी येथे भव्य रेल्वे हॉस्पिटल बांधण्यात आले होते. कल्याणनंतर इगतपुरी व भुसावळ येथेच रेल्वेचे मोठे हॉस्पिटल होते. १९९0 च्या दशकात येथे मोठमोठ्या शस्त्रक्रिया होत होत्या. भुसावळ, कसारा, नाशिक आदी ठिकाणांहून येथे रुग्ण उपचारासाठी येत होते. येथे अत्याधुनिक मशिनरी, दक्षता वाॅर्ड, अतिदक्षता वॉर्ड, जनरल वाॅर्ड व साथीच्या रोगांसाठी वेगळा वाॅर्ड होता. १६० बेड आणि सर्व सोयींनी युक्त असे हे हॉस्पिटल होते. मात्र, १९९५ नंतर हळूहळू येथील येथील कर्मचारीवर्ग कमी होत गेला. आता घाटात मोठा अपघात झाला तर रुग्णांना नाशिक किंवा कल्याण येथे हलवावे लागते. त्यामुळे रेल्वेचे सदर हॉस्पिटल पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून इगतपुरीकर करत आहे. शुक्रवारी (दि.२३) रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे इगतपुरी येथे आले असता हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आठवले यांनी तात्काळ मुंबईचे डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांच्याशी दूरध्वनीवरून हॉस्पिटल पूर्ववत सुरू करण्यासंदर्भात चर्चा केली व रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशीही चर्चा करून प्रश्न लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.