जुन्या पुलाचे तुटलेले कठडे दुरुस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 12:08 AM2021-06-02T00:08:22+5:302021-06-02T00:09:24+5:30
निफाड : येथील कादवा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले लोखंडी कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.
निफाड : येथील कादवा नदीवरील जुन्या पुलाचे तुटलेले लोखंडी कठडे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे. जवळजवळ दोन ते अडीच महिन्यांपूर्वी या पुलाच्या लोखंडी कठड्याला वाहनाने धडक दिल्याने पुलाच्या सुरुवातीला असलेले लोखंडी कठडे तुटले होते. या तुटलेल्या कठड्याचे संरक्षण व्हावे व वाहने तुटलेल्या कठड्याशेजारून सुरक्षितपणे जावी म्हणून या तुटलेल्या लोखंडी कठड्याच्या शेजारी निफाड पोलीस ठाण्याचे दोन बॅरिकेट्स लावण्यात आलेले आहे. मात्र रात्रीच्या सुमारास नाशिक बाजूकडून वेगाने येणाऱ्या वाहनांच्या वाहन चालकांना सदर लावलेले बॅरिकेट्स लक्षात येत नाही. त्यामुळे याठिकाणी वाहन चालकाचा गोंधळ उडतो. त्यामुळे अनावधानाने या बॅरिकेट्सला वाहनांची धडक बसून मोठा अपघात होऊन वाहन नदीत पडण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे सदर लोखंडी कठडे तातडीने बसवण्याची मागणी निफाडकरांनी केली आहे.
उष्म्याच्या तडाख्याने नागरिक हैराण
निफाड : तालुक्यात गेल्या आठवड्यापासून उन्हाचा तडाखा वाढल्याने नागरिक प्रचंड उष्म्याने हैराण झाले आहेत.
सकाळी ९ पासूनच उन्हाची तीव्रता वाढायला लागते त्यानंतर दुपारी तर सूर्यनारायण अक्षरशः भाजून काढीत आहे. त्यामुळे नागरिक या उष्म्याने हैराण झाले आहेत. लॉकडाऊन असल्याने नागरिक जरी घरात असले तरी जे नागरिक कामानिमित्त घराबाहेर पडतात तसेच शेतात, इमारत बांधकाम व कांदा मार्केट इतर ठिकाणी काम करणाऱ्या मजुरांना उन्हाच्या या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.