शिरवाडे ते रानवड रस्ता दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 11:35 PM2021-02-13T23:35:58+5:302021-02-14T00:31:29+5:30
शिरवाडे वणी : शिरवाडे ते रानवड या नऊ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक व अन्य प्रवासी वर्गाने केली आहे.
शिरवाडे वणी : शिरवाडे ते रानवड या नऊ किलोमीटर अंतर असलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे अतिशय दयनीय अवस्था झाली असून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत प्रलंबित असलेला महत्त्वाचा प्रश्न मार्गी लावण्यात यावी अशी मागणी परिसरातील नागरिक, वाहनचालक व अन्य प्रवासी वर्गाने केली आहे.
शिरवाडे ते रानवड हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाला जोडून येत आहे. तसेच परिसरातील गोरठाण, वावीमार्गे लासलगाव बाजार समितीला जोडून येतो त्यामुळे हा रस्ता अतिशय महत्त्वाचा मानला जातो. हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाकडे नेऊन नाशिक, मुंबई, मालेगाव, धुळे, जळगाव येथे विविध प्रकारच्या बाजार समित्यांमध्ये विक्रीला नेण्यासाठी शेतीमाल महामार्गापर्यंत शेतकऱ्यांना पाठवावा लागतो. रस्त्यावर सद्यस्थितीत मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याने वाहन चालवताना कसरत करावी लागते. काही वेळेस वाहने चालविताना अपघात सुद्धा होतात. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनांचे देखिल मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असते,
शिरवाडे ते रानवड यामधल्या रस्त्याने बस अथवा अन्य वाहनांची सुविधा नसल्यामुळे विद्यार्थी, नागरिक व अन्य प्रवासीवर्गाला पायी अथवा दुचाकीवरून महामार्गापर्यंत जात असताना रस्त्यावरील या खड्ड्यांना सामोरे जावे लागते. शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूने जागो जागी काटेरी झुडपे वाढलेली असल्यामुळे पायी चालणे कठीण होत आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त झाल्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने रस्त्याच्या कडेला बऱ्याच ठिकाणी काटेरी झुडपांची व गवताची वाढ झाली आहे रस्त्यावरून ये-जा करताना या काटेरी झुडपांचा अडथळा निर्माण होत असून ते झुडपे रस्त्यावर आले आहेत. रस्ता दुरुस्ती बाबत नागरिकांनी अनेकदा प्रयत्न केले असून तरी देखील दुरुस्तीबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तरी या रस्त्याची प्रशासनाने व लोकप्रतिनिधीनी पाहणी करून तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली जात आहे.