अलिबाग-शिर्डी बस पूर्ववत सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 06:27 PM2019-10-15T18:27:27+5:302019-10-15T18:28:53+5:30
गेल्या वीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली अलिबाग-शिर्डी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्न घटल्याने सदर बस बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांना खासगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ आली आहे.
सिन्नर : गेल्या वीस वर्षांपासून अखंडितपणे सुरू असलेली अलिबाग-शिर्डी बससेवा अचानक बंद करण्यात आल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. उत्पन्न घटल्याने सदर बस बंद करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी, या बसने दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना, चाकरमान्यांना खासगी वाहतुकीचा आधार घेण्याची वेळ आली आहे.
अलिबाग आगाराने गेल्या २० वर्षांपूर्वी अलिबाग-शिर्डी बस सुरू केली होती. कल्याण, पनवेल, नाशिक, सिन्नर, शिर्डी मार्गावर धावणारी सदर बससेवा अतिशय जुनी मानली जाते. कल्याण, पनवेल, नाशिक, सिन्नर, पांगरी, वावी, पाथरे व शिर्डी या मार्गाने धावणारी सदर बस या मार्गावर कामगार, वारकरी, प्रवासी व विद्यार्थ्यांसाठी सोयीची मानली जात होती. गेल्या वर्षापासून लालपरी बस बंद करून शिवशाही सुरू केल्याने उत्पन्न कमी मिळू लागले होते. त्यामुळे काही दिवसानंतर शिवशाही बंद करून अलिबाग आगाराने पुन्हा साधी बस सुरू केली होती; पण काही दिवसांपासून सदर बससेवा बंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ये-जा करणारे चाकरमाने व विद्यार्थ्यांचे या बसच्या चालक व वाहकांशी मैत्रीचे संबंध निर्माण झाले होते. अलिबाग-शिर्डी बससेवा पूर्ववत सुरू करण्याची मागणी प्रवासी संघटनेचे गणेश पगार यांच्यासह प्रवासी सुनील लोढे, दीपक शिंदे, वैभव दळवी आदींसह विद्यार्थी व कामगारांनी केली आहे.
अनेक वर्षांपासून या बसने ये-जा करणाºया प्रवाशांना बस बंद झाल्याची बातमी अस्वस्थ करून गेली. शिर्डी येथून सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास अलिबागकडे निघणाºया या बसमध्ये कल्याण, पनवेल, नाशिकचे प्रवासी व सिन्नर, माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कामगार तसेच सिन्नर महाविद्यालयात शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांचा भरणा मोठ्या प्रमाणात होता. नोकरदार, कामगार व विद्यार्थ्यांसाठी ही बस अतिशय सोयीची होती.