निधी खर्चासाठी सुधारित प्रशासकीय मान्यतेची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:29+5:302021-06-30T04:10:29+5:30
सटाणा : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची प्रशासकीय मान्यता रद्द करून तसेच तालुक्याबाहेरील अभियंत्यांमार्फत संबंधित कामाचे मूल्यांकन करावे या मागणीसाठी ...
सटाणा : पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीची प्रशासकीय मान्यता रद्द करून तसेच तालुक्याबाहेरील अभियंत्यांमार्फत संबंधित कामाचे मूल्यांकन करावे या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष किरण पाटील व विधानसभा अध्यक्ष अमोल बच्छाव यांनी बागलाणचे गटविकास अधिकारी पांडुरंग कोल्हे यांना साकडे घातले.
बागलाण पंचायत समितीला सन २०२०-२१ या वर्षात पंधराव्या वित्त आयोगाचा सुमारे दोन कोटी रुपयांपर्यंतचा निधी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून प्राप्त झालेला आहे. या निधीचा विनियोग करण्यासाठी शासनाने प्रत्येक सदस्याला सुमारे १२ लाख रुपयापर्यंतचा निधी खर्च करण्यासाठी शिफारस करण्याची मान्यता दिलेली आहे. त्यामुळे मतदारसंघाबाहेर निधी खर्च करण्यास शिफारस केलेल्या सदस्यांच्या सर्वच कामांच्या प्रशासकीय मान्यता तात्काळ रद्द करून त्या त्या मतदारसंघातील सदस्यांना त्यांच्याच मतदारसंघात निधी खर्च करण्यासाठी सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात याव्यात. तसेच बागलाण पंचायत समिती अंतर्गत सन २०२०-२१च्या पंधरा वित्त आयोगाच्या सर्वच कामांचे मूल्यांकन जिल्ह्यातील इतरत्र अभियंत्यांच्या माध्यमातून करण्यात यावे. कारण पंधराव्या वित्त निधीच्या वाटपामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाले असल्याची तक्रारही निवेदनाद्वारे केली आहे. पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या अभियंत्यांवर चुकीच्या कामांचे मूल्यांकन करण्यासाठी पंचायत समितीचे पदाधिकारी दबावतंत्राचा वापर करू शकता? या सर्व बाबींचा विचार करून तात्काळ चुकीच्या कामांच्या प्रशासकीय मान्यता रद्द करून सुधारित मान्यता द्याव्या व तालुक्याबाहेरील इतरत्र अभियंत्यांच्या माध्यमातून संबंधित कामांचे मूल्यांकन व्हावे व प्रत्येक कामाच्या ठिकाणावर फलक लावण्याचे आदेश देऊन कामे गुणवत्तापूर्वक झाली किंवा नाही याची खात्री केल्याशिवाय बिल अदा करण्यात येऊ नये, अशी मागणी शेवटी निवेदनात करण्यात आली आहे. (२९ सटाणा १)
===Photopath===
290621\29nsk_12_29062021_13.jpg
===Caption===
२९ सटाणा १