रस्त्यांची दुरुस्ती करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 11:18 PM2021-01-19T23:18:36+5:302021-01-20T01:34:00+5:30
सिन्नर : मुंबई - नागपूर समृद्धी महामार्ग तसेच सिन्नर-शिर्डी महामार्गाच्या कामांमुळे सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. वारंवार मागणी करूनदेखील या रस्त्यांच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष होत आहे. या सर्व रस्त्यांची तातडीने दुरुस्ती न केल्यास येत्या २६ जानेवारीपासून आमरण उपोषणास बसण्याचा इशारा सायाळे येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय शिंदे यांनी दिला आहे.

गेल्या दोन वर्षांपासून समृद्धी महामार्गाचे तर वर्षभरापासून शिर्डी महामार्गाचे काम सुरू आहे. या महामार्गासाठी साहित्य तसेच गौण खनिज वाहतुकीसाठी परिसरातील दहा-बारा किलोमीटर अंतरावरील राष्ट्रीय, राज्य व जिल्हा मुख्य मार्गाचा तसेच शिवार रस्त्यांचा वापर करण्यात येत आहे. क्षमतेपेक्षा अधिक वजनाची वाहने या रस्त्यांवरून रात्रंदिवस धावत असल्याने या सर्वच रस्त्यांची वाट लागली आहे. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले होते. मात्र तरीदेखील रस्त्याची दयनीय अवस्था दूर होत नाही. पूर्व भागातील डॉ. शिंदे यांनी तहसीलदार व जिल्हाधिकऱ्यांना निवेदन देत २६ जानेवारीपर्यंत नुकसान झालेल्या सर्व रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याची मागणी केली आहे. याबाबत योग्य कार्यवाही न झाल्यास सायाळे येथील नागेश्वर मंदिरात प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून बेमुदत उपोषण आंदोलन करणार असल्याचे शिंदे यांनी म्हटले आहे.
कोकाटेंना अल्टिमेटमचा विसर
आमदार माणिकराव कोकाटे यांनी समृद्धी महामार्ग, शिर्डी महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदार प्रतिनिधींची तसेच रस्ते विकास महामंडळ, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत दोन आठवड्यांचा अल्टिमेटम देत खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती करून देण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यानंतरही प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही न झाल्याने व आमदार कोकाटे यांनाही त्यांनी दिलेल्या अल्टिमेटमचा विसर पडला असल्याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले आहे.