कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीसाठी शासनाकडे ३८ कोटींची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:23 AM2021-05-05T04:23:09+5:302021-05-05T04:23:09+5:30
फेब्रुवारी महिन्यापासून वाढलेला कोराेना अजूनही कायम असला तरी बाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, त्या आधीच राज्य शासनाने आता ...
फेब्रुवारी महिन्यापासून वाढलेला कोराेना अजूनही कायम असला तरी बाधितांची संख्या कमी होत आहे. मात्र, त्या आधीच राज्य शासनाने आता तिसऱ्या लाटेची तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास अशाप्रकारची लाट येऊ शकते हे गृहीत धरून राज्य शासनाने नियोजन करण्याचे आदेश महापालिकांना दिले आहेत. त्यानुसार महापालिकेने काम सुरू केल्याची माहिती आयुक्त कैलास जाधव यांनी लोकमतला दिली.
सध्या काेरोना बाधितांवर उपचार करताना ज्या उणिवा भासत आहेत. त्याचा विचार करून नियोजन करण्यात येत आहे. सध्या एका दिवसाला सुमारे एक कोटीहून अधिक रक्कम कोरोना उपचार आणि व्यवस्थापनावर खर्च होत आहे. त्यामुळे नव्या लाटेची तयारी करण्यासाठी राज्य शासनाकडून ३८ कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या बिटको आणि झाकीर हुसेन रुग्णालयात मिळून सुमारे एक हजार रुग्ण दाखल असतात आणि त्यांच्यावर उपचार होत असतात आणि तिसऱ्या लाटेत आणखी अडचणी नको म्हणून महापालिकेने आत्तापासून नियोजन करताना दोन ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प सुरू करण्याची तयारी केली आहे. त्यांची क्षमता सुमारे १४ किलो लिटर्स प्रतिदिन असेल असे आयुक्तांनी सांगितले. त्यामुळे महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण उद्भवणार नाही. नवीन रुग्णालये आणि कोविड सेंटर्सचे देखील नियोजन करण्यात येणार आहे.
कोट...
महापालिकेच्या दोन्ही रुग्णालयांमध्ये हजारो रुग्णांवर उपचार करण्यात आले. डॉ.झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीचा एक अपघात वगळता गालबाेट लागले नाही. ऑक्सिजन शिल्लक नाही म्हणून रुग्णांना स्थलांतरित करण्याची नामुष्की आली नाही. रेमडेसिविरचा पुरवठा नियमित होता आता संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही उणिवा जाणवू नये यादृष्टीने नियोजन सुरू आहे.
- कैलास जाधव, आयुक्त महापालिका
इन्फो...
कोरियातून लवकरच दाखल होणार
महापालिकेच्या वतीने साडेबाराशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्यात आले आहे. कोरियातून ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पाठवण्यात येेत असून येत्या शनिवारपर्यंत (दि.८) ते दाखल होतील. त्यामुळे अगोदरचे दोनशे आणि आत्ताचे साडेबाराशे असे सुमारे साडेचौदाशे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध होणार आहेत. राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध असणारी नाशिक महापालिका पहिलीच असणार आहे.