झोडगे शाळेच्या दुरुस्तीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 10:57 PM2020-02-02T22:57:46+5:302020-02-03T00:23:27+5:30
झोडगे येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून संबंधितांनी शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांनी गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
झोडगे : येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली असून संबंधितांनी शाळेची दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांनी गटशिक्षण अधिकारी शोभा पारधी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, झोडगेतील मुलांच्या जि. प. शाळेच्या दोन वर्गखोल्या असून, त्यांचे व मुख्याध्यापक खोलीचे कौल पूर्णपणे तुटलेले आहेत. शाळेच्या काही भिंतींना तडे गेले आहेत. या वर्गखोलीतील लाकडी वासे कमकुवत झाले आहेत. शाळेतील एका शौचालयाचा दरवाजा तुटलेला आहे व एका शौचालयातले भांडे सुद्धा तुटून पडलेले आहे.
दगडी भिंतीच्या खोल्यांना आतून व बाहेरून प्लास्टर करणे गरजेचे आहे. तसेच शालेय कमानीस प्लॅस्टर करणे गरजेचे आहे. तसेच शाळेचे कौले व बांधकाम बऱ्याच वर्षांपासून कमकुवत झाले आहे. केव्हाही शाळेचे कौल पडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार पाठपुरावा करून्ही कुणी लक्ष देण्यास तयार नसल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
संबंधितांनी त्वरित जिल्हा परिषद शाळेच्या वर्गखोल्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी शेखर पगार, विष्णू सोनवणे, दशरथ मोरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.