ज्येष्ठ नागरीकांसाठी राष्ट्रीयकृत बँकेत स्वतंत्र काऊंटरची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 12:11 AM2021-07-08T00:11:49+5:302021-07-08T00:13:20+5:30
देवळा : येथील बँक ऑफ बडोदा शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरीक व पेन्शनधारकांची कुचंबना होत असल्यामुळे पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासाठी ज्येष्ठांकरता स्वतंत्र काउंटर सुरू करून गैरसोय दूर करावी, तसेच वेळेवर पेन्शन मिळावी अशी मागणी तालुका पेन्शनर्स संघटनेने केली आहे.
देवळा : येथील बँक ऑफ बडोदा शाखेत मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्यामुळे ज्येष्ठ नागरीक व पेन्शनधारकांची कुचंबना होत असल्यामुळे पैसे देण्याघेण्याचे व्यवहार करण्यासाठी ज्येष्ठांकरता स्वतंत्र काउंटर सुरू करून गैरसोय दूर करावी, तसेच वेळेवर पेन्शन मिळावी अशी मागणी तालुका पेन्शनर्स संघटनेने केली आहे.
देवळा तालुक्याची निर्मिती झाल्यानंतर शहरात स्टेट बँक व महाराष्ट्र बँकेची शाखा सुरू करण्यात आली. यामुळे शहरात बडोदा बँकेच्या ( तत्कालीन देना बँक ) शाखेवरील कामाचा भार कमी होऊन ग्राहकांना चांगली सुविधा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. परंतु ह्या तिन्ही शाखांपैकी बडोदा बँकेतील कर्मचाऱ्यांविषयी ज्येष्ठ नागरीकांच्या तक्रारी आहेत. ह्या बँकेत ग्राहक असलेल्या सेवानिवृत्त पेन्शनधारकांची संख्या मोठी आहे.
ऑनलाईन व्यवहार सुरू झाल्यापासून शहरातील सर्व राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखांमध्ये ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. यामुळे ग्राहकांना सुविधा देतांना बँक कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे. बँकेतील अपुऱ्या कर्मचारी वर्गामुळे बँकेत आलेल्या ग्राहकांना तिष्ठत थांबावे लागून वेळ वाया जातो. ज्येष्ठ नागरीक व महीलांचे जास्त हाल होतात. कॅशियरच्या काउंटरवर पैसे देण्याघेण्याचे सर्व व्यवहार होत असल्यामुळे हया ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ज्येष्ठ नागरीकांसाठी स्वतंत्र कॅश काउंटर वाढवले तर गर्दी कमी होउन ग्राहकांना चांगली सेवा मिळेल व रांगेत तिष्ठत उभे रहावे लागणार नाही. बँक व्यवस्थापनाने रिक्त अधिकाऱ्याची जागा भरावी, व ज्येष्ठ नागरीकांसाठी एक कॅश काउंटर वाढवावे अशी मागणी प्रा.आर.के. पवार, कृष्णा बच्छाव, निंबाजी आहेर, आर.के.आहिरराव आदी पेन्शन धारकांनी केली आहे.
कोट...
जून महिन्याची पेन्शन अद्याप मिळाली नाही. प्रत्येक महीन्यात पाच तारखेच्या आत पेन्शन द्यावी असे शासनाचे आदेश आहेत. परंतु याकडे दुर्लक्ष होत आहे. पेन्शन कधी येईल याची निश्चित माहीती नसल्यामुळे चौकशी करण्यासाठी वारंवार बँकेत फेऱ्या माराव्या लागतात. बहुतेक पेन्शनर व्यक्तींना उतारवयात मधुमेह, ह्रदयविकार, सांधेदुखी,आदी सारख्या विविध शारीरीक व्याधी जडलेल्या आहेत. बडोदा बँकेची शाखा पहिल्या मजल्यावर असल्यामुळे पेन्शनधारकांची जीन्याने चढउतार करून दमछाक होते.
- कृष्णा बच्छाव,सेवानिवृत्त शिक्षक, देवळा.
पेन्शन मिळण्यास होणाऱ्या दिरंगाईमुळे ह्या ज्येष्ठ व्यक्तींना पैशांअभावी आषधोपचार थांबविण्याची पाळी आली असून आरोग्याच्या नवीन समस्या उद्भवू लागल्या आहेत. त्यांची कुटुंबात मानसिक कुचंबना होत आहे. स्वतंत्रपणे राहणाऱ्या पेन्शनर व्यक्तींची अवस्था तर अतिशय बिकट झाली आहे. दरमहा पाच तारखेच्या आत पेन्शन मिळावी.
- निंबाजी आहेर, सदस्य, तालुका पेन्शनर्स संघटना. (०७ देवळा)