वृक्षलागवडसाठी स्वतंत्र निधी देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:36+5:302021-07-07T04:16:36+5:30
कळवण - कळवण : वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र निधीचा अभाव असल्यामुळे वृक्षलागवडीसाठी खड्डा खोदण्यापासून ते संवर्धनापर्यंतचा खर्च ग्रामनिधीतून करण्याच्या सरकारच्या ...
कळवण -
कळवण : वृक्षसंवर्धनासाठी स्वतंत्र निधीचा अभाव असल्यामुळे वृक्षलागवडीसाठी खड्डा खोदण्यापासून ते संवर्धनापर्यंतचा खर्च ग्रामनिधीतून करण्याच्या सरकारच्या सूचना असल्यामुळे ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतून वृक्ष लागवड करावी लागते. गावातून कर रूपाने गोळा होणारी रक्कम म्हणजे ग्रामनिधी असून, त्यातून पाणी योजनांचे वीजबिल, कर्मचाऱ्यांचे पगार व इतर खर्च भागवावे लागतात. त्यातून वृक्षसंवर्धनासाठी खर्च करणे जिकिरीचे ठरत असल्यामुळे स्वतंत्र निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी कळवण तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी आमदार नितीन पवार यांच्याकडे केली आहे.
---------------------
जायखेड्यात दुचाकीची चोरी
जायखेडा : येथील खोलगल्ली भागातील रहिवासी महेश गोसावी यांच्या मालकीची दुचाकी घरासमोरून चोरट्यांनी चोरून नेली. दुचाकी चोरटे पुन्हा सक्रिय झाल्याने दुचाकी मालक धास्तावले असून, गोसावी यांनी जायखेडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. इलेक्ट्रिक साहित्याचे विक्रेते महेश गोसावी यांनी आपल्या राहत्या घरासमोर बजाज डिस्कव्हर (एमएच-४१ एडी ५१३२) उभी केली होती. चोरट्यांनी मध्यरात्री दुचाकी चोरून पोबारा केला. या घटनेनंतर दुचाकीधारकांमध्ये भीतीचे वातावरण असून, पोलिसांनी दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.