संस्थाचालकांतील वाद निकाली काढण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2019 05:40 PM2019-07-24T17:40:13+5:302019-07-24T17:40:49+5:30
सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील सुमारे १६ शाळांतील संस्थाचालकांमध्ये वाद आहेत. त्यामुळे लक्ष पूरवून वाद निकाली काढावेत, अशी मागणी मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत यांनी केली.
जिल्हा मुख्याध्यापक संघाची बैठक भारत स्काऊड नाशिक येथे संघाचे मार्गदर्शक एस. डी. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. कार्याध्यक्ष एस. बी. शिरसाठ, सचिव एस. बी. देशमुख, उपाध्यक्ष माणिक मढवई, राजेंद्र सावंत, बी. के. शेवाळे, पुरु षोत्तम रकिबे, परवेझा शेख, शुभलक्ष्मी कुलकर्णी, शरद गिते, संगिता बाफना आदी उपस्थित होते. संस्थाचालकातील वादामुळे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ७ व्या वेतन आयोगाची वेतननिश्चितीसह विविध बाबी रखडलेल्या आहेत. संस्था वादांकीत असते, तेव्हा शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी सक्षम अधिकारी म्हणून सुनावणी घेऊन प्रकरणे निकाली काढावी अशी मागणी सावंत यांनी केली.मुख्याध्यापक संघाच्या सभासदाची नोंदणी करून सभासद वाढविणे, तालुकानिहाय जिल्हा मुख्याध्यापक संघ सलग्न तालुका मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी जाहीर करणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापकांचा सत्कार करणे, उद्बोधन शिबीर घेणे, संघाच्या कार्यालयाची डागडुजी करणे, शालेय पोषण आहारासाठी मध्यवर्ती किचन शेड मागणी, सेमी इंग्रजीच्या वर्गाना मान्यता देणे, मेडीकल बिले आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत शिक्षण उपसंचालक नितीन बच्छाव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर यांनी प्रलंबित प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले.