सिंहस्थ कामांची चौकशी करण्याची मागणी
By admin | Published: May 12, 2015 01:48 AM2015-05-12T01:48:34+5:302015-05-12T01:49:03+5:30
सिंहस्थ कामांची चौकशी करण्याची मागणी
नाशिक : महापालिकेमार्फत सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या कामांची चौकशी करून उचित कारवाई करण्याची मागणी माजी महापौर दशरथ पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.दशरथ पाटील यांनी म्हटले आहे, कुंभमेळ्यासाठी शासनाने हजारो कोटी रुपयांचा निधी दिला असून, त्याचा दुरुपयोग सुरू आहे. शासनाने मंजूर प्राकलनानुसार विकासकामांचा दर्जा तपासून त्यासंबंधी चौकशी करावी. मागील सिंहस्थ कुंभमेळ्यात महापालिकेस केवळ ६८ कोटी रुपयांचा निधी मिळाला होता. मी महापौर होण्यापूर्वी महापालिका कर्ज काढून गहाण ठेवण्यात आली होती. असे असतानाही कुंभमेळा यशस्वी पार पाडण्यात आला. मात्र, आता कुंभमेळ्याच्या नावाखाली महापालिकेने ४०० कोटी रुपयांचे कर्ज काढण्यास मंजुरी घेतली आहे. त्यास माझा विरोध आहे. मागील कुंभात तीन नद्यांवर २२ नवीन पूल उभारण्यात आले होते. यंदा मात्र जुन्याच पुलांना जोडून दोन समांतर पूल उभारले आहेत. जुन्या रिंगरोडवर डांबर ओतले जात आहे. टाकळीरोडवरील एकच मलनिस्सारण उभारता आले, पण तेसुद्धा अर्धवट स्थितीत आहे. शासनाने कामांचा दर्जा तपासून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणीही पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.