रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठ्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:10 AM2021-06-30T04:10:27+5:302021-06-30T04:10:27+5:30
ब्राह्मणगाव : येथील ब्राह्मणगाव-धांद्री रोड परिसरासह उत्तर दिशेकडील डोंगर शेतशिवारातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा होत नसल्याने रात्रही ...
ब्राह्मणगाव : येथील ब्राह्मणगाव-धांद्री रोड परिसरासह उत्तर दिशेकडील डोंगर शेतशिवारातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा होत नसल्याने रात्रही अंधारातच काढावी लागत असल्याने परिसरात सिंगल फेज वीजपुरवठा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. ब्राह्मणगावला वीज उपकेंद्र मंजूर झाले असून निधीअभावी वीज उपकेंद्राचे काम रखडले आहे. याबाबत कृषिमंत्री दादा भुसे, आ. दिलीप बोरसे यांना परिसरात सिंगल फेज योजना कार्यान्वित करावी, तर त्वरित वीज उपकेंद्राचे रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी सरपंच किरण अहिरे, उपसरपंच बापूराज खरे, विनोद अहिरे, यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच हेमंत अहिरे यांनी लेखी निवेदन दिले आहे.
ब्राह्मणगावचा परिसर मोठा असल्याने उत्तर दिशेस डोंगर भाग आहे. जंगलवस्ती त्यात डोंगर परिसरात नेहमी बिबट्यासह कोल्ह्याचे दर्शन होते. त्यामुळे दिवसा सिंगल फेज वीजपुरवठा नसला तरी चालेल; पण रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा देण्याची मागणी प्रगतिशील शेतकरी निंबा नानाजी अहिरे, दिलीप अहिरे, नानाजी अहिरे, तुषार अहिरे, कैलास अहिरे, रोशन अहिरे, पुंजाराम अहिरे, पोपट अहिरे, भगवान अहिरे, उज्जैन अहिरे, केवळ अहिरे, जयवंत अहिरे यांसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
--------------
शेतकऱ्यांची रात्र अंधारातच
परिसरातील अनेक शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतीअभावी शेतशिवारात राहतात. शेतीपंपासाठी लागणारा थ्री फेज सप्लाय तीन दिवस दिवसा तर चार दिवस रात्री वीजपुरवठा होत असल्याने जेव्हा थ्री फेज सप्लाय गेल्यानंतर रात्रीच्या वेळी सिंगल फेज वीजपुरवठा होत नसल्याने रात्रही शेतकऱ्यांना अंधारातच काढावी लागत आहे. या संपूर्ण शेतशिवारात पाच उपकेंद्रातून शेतीसाठी वीजपुरवठा होत आहे.