उन्हाचा तडाका वाढल्याने शीतपेयाला मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 05:41 PM2021-03-15T17:41:31+5:302021-03-15T17:42:10+5:30
लखमापूर : तालुक्याला दोन-तीन दिवसांपासून सूर्यनारायणाने उग्र रूप दाखविल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत, त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे.
लखमापूर : तालुक्याला दोन-तीन दिवसांपासून सूर्यनारायणाने उग्र रूप दाखविल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत, त्यामुळे शीतपेयांना मागणी वाढली आहे.
दिंडोरी तालुक्याला धरणांचा तालुका म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. परंतु सध्या सूर्यनारायणाने आग ओकायला सुरुवात केल्यामुळे सध्याच्या मितीला पारा जवळपास ३५ ते ३७ अंशाच्या वर जात असल्यामुळे नागरिकांना गारवा देणाऱ्या ठिकाणीची ओढ लागली आहे. तसेच कडक ऊन व तापमानाचे वाढणारे प्रमाण यामुळे आता तालुक्यातील खेडे व शहरी भागातील वाहतुकीची वर्दळ कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
त्यामुळे जवळजवळ सहा ते सात महिने बाजूला ठेवलेले पंखे, कूलर यांना आता सुगीचे दिवस येऊ लागले आहे. रात्री थंडी व दिवसा कडक ऊन हे समीकरण आजही दिंडोरी तालुक्यात पाहायला मिळत आहे.
साधारणपणे जुन्या जाणकारांच्या मतानुसार उन्हाची तीव्रता ही होळीनंतर वाढत असते. परंतु यंदा मात्र मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच सूर्यदेवतेने आग ओकायला सुरुवात केल्यामुळे यंदाचा उन्हाळा भयानक स्वरूपाचा येतो की काय, असा सवाल तालुक्यातील नागरिकांना पडला आहे. उन्हाची काहिली आतापासूनच नागरिकांना असह्य होऊ लागली आहे.
गरिबांचा फ्रीज बाजारात दाखल :
गरिबांचा फ्रीज म्हणून ओळखला जाणारे मातीचे माठ बाजारात दाखल झाले आहेत. उन्हाळ्यात थंड पाणी देणारे वेगवेगळ्या आकारांचे माठ बाजारात विक्रीसाठी येऊ लागल्याने ग्राहक माट घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पसंती देत आहे. हे माठ साधारणपणे चांदवड तालुक्यातील रायपूर, सुकेणा, वैजापूर, कोपरगाव आदी ठिकाणांहून विक्रीसाठी दाखल झाले आहेत.
तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी आता रसवंतिग्रहे फुलू लागली आहेत. यंदा दिंडोरी तालुक्यात उसांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने यंदाच्या ुन्हाळ्यात अनेक शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्याच्या कडेला रसवंतीची दुकाने थाटली आहेत. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्राहक वर्गाकडून वेगवेगळ्या शीतपेयांना मोठी मागणी वाढली आहे.
(१५ लखमापूर १)