जेल रोडला लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:28+5:302021-05-24T04:14:28+5:30
जेल रोडच्या इंगळेनगर चौकातील पाण्याच्या टाकीजवळील महापालिका शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी केली ...
जेल रोडच्या इंगळेनगर चौकातील पाण्याच्या टाकीजवळील महापालिका शाळेत कोविड लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी केली आहे. महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जेल रोड हा लोकसंख्येच्या आणि विस्ताराच्या मानाने प्रचंड मोठा आहे. या भागातील नागरिकांच्या लसीकरणासाठी पंचक येथील आरोग्य केंद्र हे एकमेव ठिकाण आहे. लोकसंख्या जास्त आणि लसीकरण केंद्र एकच, यामुळे तेथे कायम गर्दी होत असते. त्यामुळे तेथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण असतो. गर्दी नियंत्रणात येत नसल्याने वादाचे प्रसंग नियमितपणे घडत असतात. जेल रोडच्या इंगळेनगर चौकातील पाण्याच्या टाकीजवळ महापालिका शाळेत लसीकरण केंद्र सुरू केल्यास नागरिकांच्या सोयीचे होईल. हे ठिकाण मध्यवर्ती असून, तीन प्रभागांच्या नागरिकांसाठी मध्यवर्ती आहे. येथे बसण्यासाठी बाके व इतर सुविधा असल्याने ज्येष्ठांची हाल टळतील. या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा व लसीकरण केंद्र लवकरात लवकर सुरू करावे, अशी मागणी नगरसेवक विशाल संगमनेरे यांनी निवेदनात केली आहे.