भरवज-निरपण भागात बस सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 04:59 PM2019-12-20T16:59:18+5:302019-12-20T16:59:39+5:30
ग्रामस्थांचे निवेदन : आठ वर्षांपासून बससेवा बंद
घोटी : गेल्या आठ वर्षांपासून इगतपुरी तालुक्यातील दुर्गम आदिवासी भाग असलेल्या भरवज-निरपण भागातील एसटी बससेवा बंद आहे. यामुळे दैनंदिन कामगार, शालेय विद्यार्थी आणि आदिवासी ग्रामस्थांची प्रचंड गैरसोय होत आहे. या भागातील आदिवासी ग्रामस्थांना बसशिवाय पर्याय नसल्याने तातडीने बससेवा सुरू करावी, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांच्या वतीने भरवज-निरपण करण्यात आली आहे.
इगतपुरीचे आगार प्रमुख संदीप पाटील यांना निवेदन देऊन बंद पडलेली बससेवा सुरू करण्याची आग्रही मागणी करण्यात आली. याशिवाय, नाशिक ते इगतपुरी मार्गावर एसटी बससेवेचे वेळापत्रक कोलमडल्याने बसफेऱ्या वाढवून देण्याची विनंतीही करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, भरवज-निरपण परिसरातील गावांतून तालुक्याच्या ठिकाणी आणि घोटी, नाशिक येथे शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, सरकारी कामे, हॉस्पिटलमध्ये उपचार, बाजारपेठा व अन्य कामांसाठी जाणारे नागरिक आदी प्रवाशांची संख्या मोठी आहे. आठ वर्षांपूर्वी याठिकाणी बससेवा सुरू होती. परंतु, बससेवा बंद केल्याने प्रवाशांना खाजगी वाहनाने जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. परिसरातील प्रवाशांसाठी सकाळी ८, दुपारी १२ आणि सायंकाळी ६ वाजता बस सुरू करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. यावेळी भरवज निरपण ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच कृष्णा घारे, नथु घारे, लक्ष्मण मेमाणे, पोपट घारे, किसन घारे, किसन येडे, कुंडलिक तिटकारे, सीताबाई सुकरे, ठकुबाई मेमाणे, सखुबाई केकरे, लिलाबाई मेमाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.