रुग्णवाहिकेतून शव वाहून नेणे थांबविण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:13 AM2021-05-24T04:13:15+5:302021-05-24T04:13:15+5:30
नाशिक : महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटककडे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग व संचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन, मुंबई ...
नाशिक : महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना संलग्न आयटककडे महाराष्ट्रातील आरोग्य विभाग व संचालक वैद्यकीय शिक्षण संशोधन, मुंबई विभागातील संलग्न शासकीय रुग्णालयातील वाहनचालकांच्या रुग्णवाहिका चालकांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानुसार, बळजबरीने नियमबाह्य व कोर्टाच्या आदेशाविरुद्ध मनमानी पद्धतीने शव वाहतूक करण्याचे प्रकार घडत आहेत. रुग्णवाहिका चालक, वाहन चालक यांच्यामार्फत रुग्णवाहिकेतून शव वाहतूक करण्यात येत आहे, ते त्वरित थांबवावे असे निवेदन मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्री यांना देण्यात आले आहे. शासकीय सेवेत काम करीत असताना रुग्ण वाहिकाचालक व वाहनचालक यांना नियमबाह्य पद्धतीने शव वाहून नेण्याचे आदेश काही अधिकारी करीत आहेत. हे नियमबाह्य असून शासकीय रुग्णालय प्रशासन नियम पुस्तिका खंड एक रुग्णवाहिका सेवा मुद्दा क्रमांक सात नुसार सांसर्गिक रोगांचे रुग्ण वाहून नेण्यासाठी रुग्णवाहिका व रुग्णवाहिका चालक यांचेकडून करण्यात येऊ नये, असे स्पष्ट उल्लेख आहेत.
शववाहिका व शववाहिकाचालक हा स्वतंत्र विषय असताना ‘शववाहिका चालक’ हे पद जाणून बुजून वर्षानुवर्षे रिक्त ठेवून निष्कासित करण्यात आले. संचालक वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाअंतर्गत येणाऱ्या संस्थांमध्ये तर हे पद उपलब्धच नसल्याची धक्कादायक बाब संघटनेच्या निदर्शनास आली आहे . रुग्णवाहिका चालकास शववाहिका चालवावयास सांगितल्याने रुग्णसेवा बाधित होऊ शकते. तसेच हा न्यायालयाचा अपमान आहे. त्यामुळे आयटक संघटनेने हा अत्यंत घृणास्पद प्रकार त्वरित थांबविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह आरोग्य मंत्र्यांना त्याबाबत निवेदन दिले आहे.
इन्फो
नियमबाह्य काम
सद्यस्थितीतील कार्यरत असलेल्या वाहनचालकांकडून बळजबरीने शव वाहण्याचे प्रकार सुरू आहेत, जे मानवी आरोग्य व अधिकार यांचे हनन आहे. असे यापूर्वी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण(मॅट) निकालाअंतर्गत न्यायालयाने हे नियमबाह्य असल्याचे आदेशात स्पष्ट केलेले असतानाही काही ठिकाणी असे नियमबाह्य प्रकार बळजबरी व धमकीने करण्यात येत आहेत.