सिंहस्थासाठी भरीव निधीची तरतूद हवी : खासदार द्वयींची भूमिका
By admin | Published: February 17, 2015 12:14 AM2015-02-17T00:14:37+5:302015-02-17T00:16:33+5:30
ओझर विमानतळासह नाशिक -पुणे, नाशिक-सुरत, मनमाड-इंदोर रेल्वेलाही मिळावी गती
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या पाच-सहा महिन्यांवर येऊन ठेपला असून, अद्यापही केंद्र स्तरावरून भरीव निधी उपलब्ध झालेला नाही. येत्या केंद्रीय अर्थसंकल्पात सिंहस्थांसाठी भरीव निधीची तरतूद ठेवण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे पाठपुरावा करावा. तसेच देश-परदेशातून नाशिकला भाविक येणार असल्याने नाशिकची हवाई सेवा सुरू करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करावेत, अशी भूमिका नाशिक व दिंडोरीच्या खासदार द्वयींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडली. काल (दि.१६) मुख्यमंत्र्यांनी स'ाद्री अतिथीगृहावर महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक बोलविली होती. केंद्रीय अर्थ संकल्पाच्या आधी राज्यातील विविध प्रश्नांची सोडवणूक व पाठपुरावा आणि त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करण्यासाठी ही बैठक बोलविण्यात आली होती. त्यात नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी सांगितले की, अवघ्या पाच-सहा महिन्यांवर सिंहस्थ कुंभमेळा येऊन ठेपला असून, अद्यापही केंद्र स्तरावरून सिंहस्थांसाठी आवयक निधीची तरतूद उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. ही तरतूद वेळेत झाली, तर भाविकांना वेळेत सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात प्रशासनाला यश येईल. नाशिक-पुणे रेल्वेमार्गाचे सर्वेक्षण झाले असून, त्यालाही केंद्रास तत्त्व गती देण्याची गरज आहे. शीलापूर येथे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब व सिन्नरत तालुक्यातील सावतामाळीनगर येथे कृषी महाविद्यालयास तत्त्वता मान्यता मिळाली असून, राज्य शासनाने त्यासाठी केंद्र स्तराकडे पाठपुरावा करून निधी मिळवावा, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी केली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी तामिळनाडूतील नेमली येथील समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून पिण्याचे पाणी तयार केलेल्या पावणे सहाशे कोटींच्या पाणी प्रकल्पाच्या धर्तीवर मुंबईसह राज्यात जेथे शक्य असेल त्या समुद्र किनारी समुद्राच्या अशा पाण्यापासून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य शासनाने केंद्राकडे पाठपुरावा करून भरीव निधीच्या तरतुदीबाबत आग्रही भूमिका घ्यावी, असे सांगितले. त्याचप्रमाणे मनमाड-इंदोर रेल्वेमार्गासाठी आपण रेल्वेबजेटमध्ये वेळोवेळी भूमिका मांडली असून, राज्य शासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा केला पाहिजे. तसेच नाशिक-पुणे, नाशिक सुरत रेल्वेमार्गासाठीही केंद्र शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना मांडली. (प्रतिनिधी) इन्फो.. ओल्या पार्ट्या थांबतील नाशिक विमानतळाचे हस्तांतर तत्काळ करून तेथून सिंहस्थापूर्वी विमान सेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार हरिश्चंद्र चव्हाण व खासदार हेमंत गोडसे यांनी केली. हस्तांतर होत नसल्याने तेथे होत असलेल्या ओल्या पार्ट्या थांबतील, अशी उपरोधिक टीकाही खासदार चव्हाण यांनी केली.