उसाच्या बांड्यांना मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 10:14 PM2020-02-25T22:14:43+5:302020-02-26T00:15:51+5:30
येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी लष्करी अळीने मात्र मक्याच्या चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने उसाच्या बांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे
मानोरी येथे थेट घरपोच आलेल्या उसाच्या बांड्या जनावरांना चारा म्हणून विकत घेताना शेतकरी.
मानोरी : येवला तालुक्यात यंदा समाधानकारक पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी लष्करी अळीने मात्र मक्याच्या चाºयाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. अनेक शेतकऱ्यांचा मक्याचा चारा यंदा मोठ्या प्रमाणात शिल्लक असला तरी हिरवा चारा मिळत नसल्याने उसाच्या बांड्यांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. येवला तालुक्यातील मुखेड, सत्यगाव, दत्तवाडी, नेऊरगाव, भिंगारे, मानोरी बुद्रुक परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात उसाचे उत्पादन शेतकरी वर्गाने घेतले असून, मुबलक पाण्यामुळे उसाचा दर्जादेखील चांगल्या प्रमाणात सुधारला असून, सध्या ऊसतोडणी सुरू असल्याने या उसाच्या बांड्यांना जनावरांना हिरवा चारा म्हणून शेतकरी वर्गाकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
यंदा दुग्ध व्यवसायालादेखील अच्छे दिन आलेले असल्याने यंदा शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसाय सुरू केले आहे. दोन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती असल्याने जनावरांना वेळेवर चारा मिळत नव्हता. दोन वर्षांपासून दुधाला १८ ते २० रु पये प्रतिलिटर इतका दर मिळत होता. यातून दुधाचा उत्पादन खर्चदेखील फिटणे कठीण होऊन गेले होते. यंदा मात्र चारा मोठ्या प्रमाणात असून, उसाच्या हिरव्या बांड्यांमुळे दुधाला अच्छे दिन आले आहेत. त्यात ढेपीचेदेखील दर कमी झाले असल्याने सध्या दुधाला सरासरी ३४ रुपये प्रतिलिटर इतका उच्चांकी दर मिळत आहे. त्यामुळे मुखेड येथे हिरव्यागार बांड्या घेण्यासाठी दररोज शेतकरी मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत. मानोरी, खडकीमाळ, देशमाने, भिंगारे, सत्यगाव, वाकद, नेऊरगाव, शिरवाडे आदी गावांतील शेतकरी वर्ग आपल्या गायींना उसाच्या हिरव्या बांड्या घेण्यासाठी येत असतात. ऊसतोड कामगार दुपारी तीन ते चार वाजेपर्यंत ऊस तोडून उसाच्या ट्रक भरून दिल्यानंतर उसाच्या बांड्या विकण्यासाठी गावोगावी फिरत असतात. उसाच्या बांड्यांना सध्या शंभर रुपये शेकड्याप्रमाणे दर मिळत आहे.