जालना येथून सिंहस्थासाठी रेल्वेगाडीची मागणी
By Admin | Published: August 3, 2015 10:33 PM2015-08-03T22:33:31+5:302015-08-03T22:34:19+5:30
कुंभमेळा : नाशिकसह मराठवाड्यातील प्रवाशांची गैरसोय
कसबे सुकेणे : नाशिक येथील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह मराठवाड्यातील भाविकांसाठी जालना येथून नाशिक पॅसेंजर रेल्वेगाडी सोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. सिंहस्थात मराठवाड्यातून नाशकात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते.
कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाने आजवर मध्य रेल्वेमार्गावर लांब पल्ल्याच्या सिंहस्थ कुंभमेळा स्पेशल रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. परंतु या गाड्यांना औरंगाबाद, नगर, जळगाव, नाशिक व ठाणे या जिल्ह्यांच्या लहान रेल्वेस्थानकांवर थांबा नसल्याने ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांची पर्वणी स्रानांच्या काळात गैरसोय होणार आहे.
कुंभमेळ्यासाठी आजवर सोडण्यात आलेल्या रेल्वेगाड्या ह्या मध्य रेल्वेमार्गावर असून, मराठवाड्यातील व नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील लहान स्थानकांवरून चढउतार करणाऱ्या भाविकांचा विचार केला गेला नसल्याने नाराजी व्यक्त होत
आहे.
मराठवाड्यातूनही लाखो भाविक येणार असल्याने दक्षिण मध्य रेल्वेने जालना, नगरसूल, मनमाड, नाशिकरोड अशी पॅसेंजर गाडी सोडावी, अशी मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती तसेच नाशिक जिल्हा प्रवासी संघटनेने केली आहे. तसेच भुसावळहून नाशिकरोड जाणाऱ्या कुंभ स्पेशल गाड्यांना म्हसावद, पाचोरा, कजगाव, न्यायडोंगरी, नांदगाव, लासलगाव, निफाड, कसबे सुकेणे या स्थानकांवर दोन मिनिटांचा थांबा द्यावा, अशी मागणी प्रवासी केली आहे.
जालना ते नगरसूल या पॅसेंजर गाडीचा इगतपुरीपर्यंत विस्तार करण्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले होते. तसा डेमोही यशस्वी झाला. परंतु कुठे माशी शिंकली कोण जाणे, ही पॅसेंजर अद्याप सुरू न झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या घोषणा केवळ कागदोपत्रीच का, असा सवाल प्रवासी व्यक्त करीत असून, इतर जलद गाड्यांपेक्षाही जास्त या पॅसेंजरला प्रतिसाद लाभेल, असेही प्रवाशांनी सांगितले. (वार्ताहर)