आठवडे बाजार सुरू करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 10:24 PM2020-08-12T22:24:28+5:302020-08-13T00:08:06+5:30
ओझरटाऊनशिप : जिल्ह्यातील बंद असलेले आठवडे बाजार पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी नाशिक जिल्हा आठवडे बाजार विक्रेता संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ओझरटाऊनशिप : जिल्ह्यातील बंद असलेले आठवडे बाजार पूर्ववत सुरू करावेत, अशी मागणी नाशिक जिल्हा आठवडे बाजार विक्रेता संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
गेल्या पाच महिन्यांपासून नाशिक जिल्ह्यातील आठवडे बाजार बंद आहेत. ५ आॅगस्ट २०२० रोजी महाराष्टÑ शासनाने बहुतांशी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली आहे. परंतु यात आठवडे बाजार सुरू करण्याबाबत कुठलेही निर्देश शासनाने दिलेले नसल्याने आठवडे बाजार सुरू झालेले नाहीत. आठवडे बाजार हे एकमात्र उपजीविका चालवण्याचे साधन असलेला मोठा किरकोळ विक्रेता वर्ग नाशिक जिल्ह्यात आहे. गेल्या पाच महिन्यांपासून आठवडे बाजार बंद असल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. केंद्र सरकारने छोट्या व्यावसायिकांसाठी घोषित केलेल्या मदत पॅकेज योजनेचे निकष व माहिती अद्यापपर्यंत या छोट्या व्यावसायिकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे त्या मदतीपासूनदेखील हे छोटे व्यावसायिक वंचित आहेत. जिल्ह्यातील आठवडे बाजार सुरू करण्यात यावेत व केंद्र सरकारने छोट्या व्यावसायिकांसाठी घोषित केलेल्या मदत पॅकेजची अंमलबजावणी करणेबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे नाशिक जिल्हा आठवडे बाजार विक्रेता संघाच्या वतीने संघाचे पदाधिकारी अनिल रासकर, आर. टी. कदम, बाळासाहेब कळमकर, सुधाकर वाणी यांनी केली आहे.