मतदान यंत्राविरुद्ध धरणे आंदोलन
By admin | Published: March 25, 2017 11:59 PM2017-03-25T23:59:00+5:302017-03-25T23:59:18+5:30
नाशिक : मतदान यंत्रात फेरफार झाल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, राष्ट्रवादी लोकतंत्र बचाव आंदोलनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.
नाशिक : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदान यंत्रात फेरफार झाल्याच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता, राष्ट्रवादी लोकतंत्र बचाव आंदोलनाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘इव्हीएम हटाओ, बॅलेट पेपर लाओ’ या मागणीसाठी ७२ तासांचे धरणे आंदोलन करण्यात आले. राष्ट्रीय लोकतंत्र बचावच्या वतीने संपूर्ण राज्यात अशा प्रकारचे आंदोलन छेडण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात ७२ तासांचे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. न्यायालयाने मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट यंत्र बसविण्याचे आदेश दिलेले असतानाही नुकत्याच झालेल्या निवडणुकीत न्यायालयाचा निर्णय डावलण्यात आला, त्यामागे मतदान यंत्राचे सेटिंग असल्याचा आरोपही लोकतंत्रने केला आहे. संपूर्ण राज्यात तसेच नुकत्याच झालेल्या उत्तर प्रदेश निवडणुकीतदेखील मतदान यंत्राबाबत तक्रारी करण्यात आल्या असून, न्यायालयातदेखील दावे दाखल झालेले आहेत. मतदान यंत्राबाबत लोकभावनेचा विचार करता पूर्वीसारखेच मतपत्रिकाचा वापर करून यापुढे निवडणुका घेतल्या जाव्यात अशी मागणीही करण्यात आली आहे. या आंदोलनात अॅड. प्रदीप संसारे, व्ही. बी. महाले, बंडुनाना अहिरे, विराज दाणी, राहुल अहिरे, जावेद पठाण, वृशाल अंभोरे, सागर पवार, सुजाता चौदंते आदि सहभागी झाले आहेत.