ईव्हीएम-व्हीव्हीपॅट यंत्रांचे प्रात्यक्षिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2019 07:20 PM2019-03-09T19:20:21+5:302019-03-09T19:20:56+5:30
ईव्हीएम यंत्राविषयी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात आली.
लोकमत न्युज नेटवर्क
नाशिक : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात प्रसारमाध्यम आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसाठी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांबाबत प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.
ईव्हीएम यंत्राविषयी आणि निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेविषयी सर्वसामान्य मतदारांमध्ये कोणताही संभ्रम राहू नये आणि ईव्हीएम व व्हीव्हीपॅटविषयी नागरिकांमध्ये जनजागृती होण्याच्या दृष्टीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्रांची माहिती देण्यात आली. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या शंकांचे निरसन यावेळी करण्यात आले. मतदानाचे वेळी बॅलट युनिट, कंट्रोल युनिट आणि व्हीव्हीपॅट असे तीन युनिट मिळून मतदान प्रणाली तयार होईल. ही प्रणाली पूर्णत: मतदानासाठी तयार आहे हे दर्शविण्यासाठी सुरुवातीस सात प्रकारचे रिपोर्ट स्लिपच्या स्वरूपात व्हीव्हीपॅटमधून प्राप्त होतील. मतदान केल्यानंतर व्हीव्हीपॅट यंत्रात सात सेकंदापर्यंत मतदान कोणत्या उमेदवाराला केले आहे हे दर्शविणारी स्लिप दिसणार आहे. ही स्लिप नंतर व्हीव्हीपॅट यंत्रात संकलित होईल. त्यामुळे मतदाराला योग्यरीतीने मतदान झाल्याची खात्री करता येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेची माहिती तज्ज्ञांनी यावेळी दिली. यावेळी मनपा उपायुक्त रोहिदास बहिरम, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, तहसीलदार प्रशांत पाटील, तहसीलदार अनिल दौंडे, नायब तहसीलदार सविता पठारे आणि तंत्रशिक्षण विभागाचे तांत्रिक सहायक उपस्थित होते.
(फोटो आहे)