डाबलीच्या शेतकऱ्यांची अजंग उपकेंद्रासमोर निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2022 23:58 IST2022-02-14T23:57:33+5:302022-02-14T23:58:10+5:30
वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली येथे सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजंग येथील उपकेंद्रासमोर निदर्शने केली.

डाबली येथे वीजपुरवठा सुरळीत करावा, यासाठी अजंग उपकेंद्रात अधिकाऱ्यांशी चर्चा करताना शेतकरी.
वडनेर : मालेगाव तालुक्यातील डाबली येथे सुरळीत वीजपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अजंग येथील उपकेंद्रासमोर निदर्शने केली.
डाबली शिवारातील शेतकऱ्यांसाठी येथील विद्युत उपकेंद्रामार्फत आठवड्यातील चार दिवस थ्री फेज विद्युत पुरवठा अपेक्षित असताना तो आठवड्यातून फक्त तीनच दिवस करण्यात येतो. तसेच शिवारात बिबट्याचा वावर अनेकदा आढळून आला. रात्रीच्या वेळी थ्री फेजचा वीजपुरवठा केल्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारात शेतात पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागत आहे. त्यामुळे बिबट्याची दहशत आहे.
विद्युत मंडळाने दिवसा थ्री फेज वीज पुरवावी व शेतकऱ्यांच्या जीवाशी चाललेला खेळ थांबवावा, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे पिकांचे होत असलेले नुकसान थांबवावे, यासाठी शेकडो शेतकऱ्यांनी विद्युत उपकेंद्रासमोर निदर्शने करीत वीजपुरवठा त्वरित सुरळीत सुरू करण्याची मागणी केली. यावेळी वीज मंडळाचे अधीक्षक अभियंता जयंतीलाल भामरे व उपकार्यकारी अभियंता एम. आर. साळुंखे यांनी घटनास्थळी भेट देऊन निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. दोन दिवसांत वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सरपंच एकनाथ भोसले, पोलीस पाटील दादाजी बच्छाव, वडेलचे ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शेलार यांच्यासह संदीप भोसले, किशोर निकम, संजय निकम, अशोक पाटील, प्रशांत देवरे, छोटू निकम, सुभाष बच्छाव, जगन्नाथ चौधरी आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.