किसान सभेतर्फे निदर्शने
By admin | Published: May 10, 2016 10:29 PM2016-05-10T22:29:20+5:302016-05-10T22:45:44+5:30
पिंपळगाव बसवंत : कांद्याला हमीभाव द्या
पिंपळगाव बसवंत : कांदा पिकाला मिळणाऱ्या मातीमोल भावाच्या निषेधार्थ मंगळवारी
दुपारी १ वाजेच्या सुमारास नाफेड कार्यालय पिंपळगाव बसवंत येथे अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने निर्देशने करून निवेदन दिले. गेल्या दोन वर्षापासून पावसाने
दगा दिल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
जी थोडीफार पिके आली त्यांना अवकाळी पाऊस, गारपीट यांना सामोरे जावे लागले. यावर्षी कांद्याचे पीक बऱ्यापैकी आले होते. मात्र या कांदा पिकाची खरेदी व्यापारीवर्ग अतिशय कमी भावाने करीत आहे. या कमी भावामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च, वाहतूक खर्चदेखील भरून निघत नाही. शेतकऱ्यांना सर्व कांदा शासनाने नाफेडमार्फत २२०० रुपये क्विंटल दराने विकत घ्यावा, त्याचे वितरण सरकारने करावे
तसेच स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसीप्रमाणे शेतमालाला उत्पादन खर्च, अधिक जीवन जगण्याचा खर्च म्हणून ५० टक्के
नफा धरून हमीभाव द्यावा या मागणीसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने नाफेड कार्यालय पिंपळगाव बसवंत येथे निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. किसन गुजर, कार्याध्यक्ष सुनील मालुसरे, चांदवड तालुका सेक्रेटरी तुकाराम गायकवाड, चांदवड तालुकाध्यक्ष हनुमंत गुंजाळ, देवळ्याच्या आशाबाई जाधव, रमेश चौधरी, जयराम गावित आदिंसह चांदवड, देवळा, निफाड, नांदगाव, सुरगाणा आदि तालुक्यातील हजारो किसान सभेचे कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर)