दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2020 04:31 AM2020-12-15T04:31:18+5:302020-12-15T04:31:18+5:30
नाशिक : दिल्लीत गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी ...
नाशिक : दिल्लीत गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह विविध संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर एकत्रित येऊन केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीसह आंदोलन केले. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिकांनीही या आंदोलनात सहभाग नोंदवला असून, दिल्लीतील आंदोलनाचे लोण आता नाशिकमध्येही पसरू लागल्याचे दिसून येत आहे.
केंद्र सरकारने कृषी क्षेत्रातीलउत्पादन, व्यापार व विपणनविषयक आणलेले तिन्ही सुधारणा कायदे हे शेतकरीविरोधी असल्याचा आरोप करीत जनआंदोलन संघर्ष समितीसह किसान सभा, संगीनी महिला संघटना, माकप, काँग्रेस, भाकप, आप, वंचित आघाडी, आरपीआय, बसपा, छात्रभरती, ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, आयटक, जनवादी महिला संघटना, नागपंथीय सामाजिक संस्था आदी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी या आंदोलनात सहभाग घेत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करीत हे नवीन तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याची मागणी केली. पंजाब व हरियाणासह देशभरातून आलेल्या शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीला घेराव घातला असून, जवळपास गेल्या २० दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. कडाक्याच्या थंडीमध्ये शेतकरी दिल्लीच्या भोवती महामार्गांवर ठिय्या मांडून बसले असताना केंद्र सरकार या आंदोलन फूट पाडण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही यावेळी आंदोलकांनी केला आहे. केंद्र सरकारचे हे तिन्ही नवीन कायदे शेतकरीविरोधी असून, ते रद्द करण्याची या शेतकऱ्यांची मागणी असून, त्यांना पाठिंबा देत केंद्र सरकारने हे कायदे त्वरित मागे घेण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे, उत्तम कांबळे, डॉ. डी. एल. राड, राजू देसले, शरद आहेर, डॉ. शोभा बच्चव, अनिता पगारे, गणेश उनवणे, प्रभाकर वायचळे, गिरीश उगले, जगमीर सिंग खालसा, सुनील मालुसरे, बी. जी. वाघ, डॉ. हेमलता पाटील, ॲड. तान्हाजी जायभावे, बाळासाहेब शिंदे, ऊर्मिला गायकवाड, अरुण काळे, विजय पाटील, दीपक डोखे आदी विविध संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलनात सकहभाग घेत केंद्र सरकारच्या शेती व शेतीवषयक धोरणांविरोधात निषेध नोंदविला.
शेतकऱ्यांचे आंदोलन हाताळले नाही तर अराजकता - डॉ. रावसाहेब कसबे
राजधानी दिल्लीत शेतकर्यांचे ऐतिहासिक आंदोलन सुरू आहे. केंद्र सरकार हे आंदोलन बदनाम करीत आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. ही कोणतेही आंदोलन हाताळण्याची योग्य पद्धत नाही. शेतकऱ्यांचे आंदोलन व त्यांचे आंदोलन योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही तर देशात अराजकता माजेल आणि त्यास केंद्र सरकार जबाबदार राहील, असा इशारा ज्येष्ठ साहित्यिक डॉ. रावसाहेब कसबे यांनी केंद्र सरकारला दिला आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात व त्यासाठी सकारात्मक बोलणी करावी, असा सल्लाही त्यांनी यावेळी केंद्र सरकारला दिला आहे.
(फोटो-१४पीएचडीसी६१) दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासमोर निदर्शने करताना डॉ. डी. एल. कराड, शरद अहेर, शाहू खैरे, ॲड. तानाजी जायभावे, डॉ. हेमलता पाटील, वत्सला खैरे, नीलेश खैरे, ज्ञानेश्वर काळे, दीपक डोखे, विजय पाटील, शशिकांत उनवणे आदी.