काळ्या फिती लावून कामकाज तहसीलदारांची निदर्शने : पोलीस संरक्षण देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:32 AM2017-12-17T01:32:58+5:302017-12-17T01:34:11+5:30
गौणखनिज माफियांकडून पारनेरच्या तहसीलदारांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.
नाशिक : गौणखनिज माफियांकडून पारनेरच्या तहसीलदारांवर करण्यात आलेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करून दिवसभर काळ्या फिती लावून कामकाज करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कुकडी नदी पात्रात होणाºया अवैध गौणखनिज वाळू उत्खननास तहसीलदार भारती सागरे व त्यांच्या पथकाने अटकाव केला असता, वाळू माफियांनी या पथकावर हल्ला चढविला तसेच तहसीलदारांच्या अंगावर डिझेल ओतून पेटवून देण्याचा प्रयत्न केला. अशा प्रकारच्या घटना महाराष्टÑात सातत्याने घडत असून, या संदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यापलीकडे शासनाकडून कोणताही ठोस व धोरणात्मक निर्णय घेतला जात नाही, परिणामी वाळूमाफियांची मुजोरी दिवसेंदिवस वाढत चालली व त्यातून हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. गौण खनिज प्रतिबंधक पथकाला सशस्त्र पोलीस संरक्षण पुरविण्याचे शासनाने मान्य केले, परंतु त्याची अंमलबजावणी होत नाही त्यामुळे अधिकाºयांचे मनोधैर्य खचू लागले आहे. शासनाने आता तरी पारनेरच्या घटनेची दखल घ्यावी व माफियांविरुद्ध कडक कारवाई करावी अन्यथा २७ जानेवारीपासून राज्यातील महसूल अधिकारी गौणखनिज प्रतिबंधाची कार्यवाही करणार नाहीत, असा इशारा तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने दिला आहे. यावेळी तहसीलदार शरद घोरपडे, चंद्रकांत देशमुख, प्रशांत पाटील, सुचेता भामरे, देवगुणे, नवनीत सुसलादे, पंकज पवार, विठ्ठल मोराणकर, राजेंद्र शेवाळे, राजेश मोरे आदी उपस्थित होते.