धनेर गाव विकासापासून वंचित
By admin | Published: February 21, 2016 10:14 PM2016-02-21T22:14:20+5:302016-02-21T22:44:51+5:30
स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याची ग्रामस्थांची मागणी
कळवण : दरेभणगी व धनेर ग्रुप ग्रामपंचायतीचे विकेंद्रीकरण करून धनेर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत कार्यान्वित करावी, अशी मागणी शेकडो धनेर आदिवासी ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी दीपेंद्र कुशवाह यांच्याकडे केली आहे. दरेभणगी, धनेर ग्रुप ग्रामपंचायत स्थापन होऊन २८ वर्षे झाली परंतु गेल्या काही वर्षांपासून धनेर गावात कुठल्याही प्रकारची विकासकामे झाली नाहीत. त्यामुळे धनेर गाव विकासापासून वंचित असून, या गावाला विकासकामांना चालना मिळत नसल्यामुळे लोकसंख्या असलेल्या १०० टक्के आदिवासी असलेल्या धनेर गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी, अशी मागणी धनेर ग्रामस्थांनी केली आहे
कळवणपासून १० ते १२ किमी अंतरावर असलेले धनेर गाव विकासापासून वंचित असून, पाणी, रस्ते, वीज, आरोग्य या मूलभूत सुविधांसह सर्वांगीण विकासासाठी धनेर गावासाठी स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्यासाठी शासनस्तरावरून कार्यवाही व्हावी, अशी मागणी धनेरचे हिराचंद गावित यांनी केली आहे. धनेर ग्रामस्थांनी कळवण पंचायत समितीमध्ये ग्रामपंचायत अस्तित्वात आणावी या मागणीचे यापूर्वी निवेदन देऊन मागणी केली आहे; मात्र कुठल्याही प्रकारची कार्यवाही झाली नाही. शिवाय धनेर गावात झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी कुणीही अधिकारी व कर्मचारी न आल्याने धनेर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धनेर येथे स्वतंत्र ग्रामपंचायत अस्तित्वात आणण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, नितीन पवार, कळवण पंचायत समितीच्या सभापती संगीता ठाकरे, उपसभापती अॅड. संजय पवार यांनी लक्ष केंद्रित करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. (वार्ताहर)