डेंग्यूचा जोर ओसरला

By admin | Published: November 17, 2016 12:36 AM2016-11-17T00:36:22+5:302016-11-17T00:35:29+5:30

थंडीत वाढ : धोकादायक शहरातून नाशिक बाहेर

Dengue burns out | डेंग्यूचा जोर ओसरला

डेंग्यूचा जोर ओसरला

Next

नाशिक : शहरात गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या प्रमाणात वाढ होत असल्याने डेंग्यूचाही जोर ओसरत चालला असून शासनाने डेंग्यूबाबत जाहीर केलेल्या धोकादायक शहरांच्या यादीतून नाशिक बाहेर पडले आहे. आता राज्यातील मुंबई आणि पुणे या दोनच शहरांमध्ये डेंग्यूचा प्रभाव अजूनही कायम असल्याचे सांगितले जात आहे.
गेल्या दोन-अडीच वर्षांपासून नाशिककरांना डेंग्यूच्या आजाराने पछाडले आहे. यावर्षी डेंग्यूच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. प्रामुख्याने जून ते आॅक्टोबर या कालावधीत रुग्णसंख्या जास्त होती. नाशिकसह राज्यभरात डेंग्यूने थैमान घातल्याने शासनाच्या आरोग्य विभागाने त्याची गंभीर दखल घेत विशेष कृती मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. डेंग्यूच्या आजारामुळे धोकादायक शहरांच्या यादीत नाशिकचाही समावेश होता. महापालिकेनेही वारंवार मोहिमा राबवून डेंग्यूच्या अळ्या नष्ट करण्याचे काम केले, परंतु डेंग्यूच्या आजाराची रुग्ण संख्या काही केल्या कमी होत नव्हती. महापालिकेने त्यासाठी पेस्ट कंट्रोलच्या ठेकेदारालाही जबाबदार ठरवत काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, महापालिकेकडून प्रयत्न सुरू असतानाच गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होऊन थंडीच्या प्रमाणात वाढ होत आहे. त्यामुळे डेंग्यूच्या रुग्णसंख्येतही घट होताना दिसून येत आहे. नाशिकमध्ये यावर्षी १ जानेवारी ते १५ नोव्हेंबर २०१६ या कालावधीत २१६४ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले. त्यापैकी ८०९ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे निष्पण्ण झाले होते. या महिन्यात दि. १ ते १६ नोव्हेंबर या कालावधीत १३४ संशयित रुग्ण दाखल झाले असून, त्यापैकी ३४ रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Dengue burns out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.