अभोण्यात दोघांना डेंग्यूची लागण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 11:10 PM2019-10-17T23:10:00+5:302019-10-18T01:03:27+5:30
कळवण तालुक्यातील अभोणा येथे दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम व जनजागृतीला सुरुवात करण्यात आली असून, डेंग्यूचे डास उत्पत्तीचे जवळपास २५ ते ३० ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत.
नाशिक : कळवण तालुक्यातील अभोणा येथे दोघांना डेंग्यूची लागण झाल्याचे निदर्शनास येताच आरोग्य विभाग खडबडून जागा झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून आरोग्य कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम व जनजागृतीला सुरुवात करण्यात आली असून, डेंग्यूचे डास उत्पत्तीचे जवळपास २५ ते ३० ठिकाणे नष्ट करण्यात आली आहेत.
तीन ते चार दिवसांपूर्वी अभोणा ग्रामीण रुग्णालयात दोन रुग्ण उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या रुग्णांच्या रक्त तपासणीतून त्यांना डेंग्यूची लागण झाल्याचे लक्षात आल्याने आरोग्य विभागाने त्याची गंभीर दखल घेतली. यंदा अभोणा व परिसरात जोरदार पाऊस झाला असून, पावसाचे पाणी अजूनही जागोजागी साचलेले आहे. त्यातच अभोण्याच्या खडकाळ भूभागावर जागोजागी डबके कायम आहेत.
सदरची बाब लक्षात येताच, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विजय डेकाटे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील, डॉ. रवींद्र सपकाळे, डॉ. सिद्धू आदींनी अभोणा येथे धाव घेऊन ग्रामपंचायतीत सरपंच व नागरिकांची बैठक घेऊन डेंग्यूविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर आरोग्य कर्मचारी व ग्रामस्थांच्या मदतीने संपूर्ण गावात डेंग्यू डास उत्पत्तीच्या ठिकाणांचा शोध घेण्यात येऊन सुमारे २५ ठिकाणे नष्ट करण्यात आली. दोन दिवसांपासून गावात आरोग्य कर्मचारी घरोघरी जाऊन सर्व्हे करीत असून, त्यात नवीन एकही रुग्ण आढळलेला नाही.
नागरिकांनी घराच्या गच्चीवर तसेच आवारात पिंप, टाक्यांमध्ये पाणी साठवून ठेवलेले आहे. अशा स्वच्छ पाण्यातच डेंग्यूच्या डासांची अंडी व अळ्यांचा उपद्रव वाढला आहे. उष्णतेचे प्रमाण वाढले असून, हा काळ डेंग्यूच्या डासाच्या उत्पत्तीसाठी अनुकूल आहे. त्यातूनच अभोण्यात डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती वाढीस लागली आहे.