डेंग्यू, चिकुनगुनियाचा कहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:17 AM2021-08-26T04:17:53+5:302021-08-26T04:17:53+5:30
नाशिक : गतवर्षी जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट जोरात होती. मात्र, त्या कालावधीत डेंग्यूसह चिकुनगुनियाचे प्रमाण ...
नाशिक : गतवर्षी जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये कोरोनाची पहिली लाट जोरात होती. मात्र, त्या कालावधीत डेंग्यूसह चिकुनगुनियाचे प्रमाण यंदाच्या तुलनेत अत्यल्प होते; परंतु यंदा मात्र जुलै, ऑगस्ट या दोन महिन्यांत कोरोनाची लाट ओसरत असताना डेंग्यूसह चिकुनगुनियाने थैमान घातले आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या लॅबमध्येच डेंग्यूचे ५७५, तर चिकुनगुनियाचे ४६५ रुग्ण आढळले असून, खासगी लॅबमधून मिळालेल्या अहवालांतून ही संख्या ७ हजारांवर पोहोचली आहे. प्रत्येक कॉलनी, गल्ली, चाैक परिसरांमध्ये, तसेच विशेषत्वे पाणी साचण्याची स्थाने असलेल्या परिसरांमध्ये या रुग्णांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत दुपटीवर पोहोचली आहे.
जिल्ह्यात समाधानकारक झालेल्या पर्जन्यवृष्टीनंतर एकूणच डासांमुळे होणाऱ्या आजारांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. विशेषत्वे डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यासारखे आजार वाढले असून, डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या वाढत्या प्रमाणामुळे अनेकांना रुग्णालयात ॲडमिट करण्याचीही वेळ येत आहे. डास चावल्यापासून डेंग्यूची प्राथमिक लक्षणे दिसायला ४ ते ७ दिवस लागतात. त्यानंतर पहिले ३-४ दिवस ताप येतो. ४-५ दिवसांनी ६५ टक्के लोकांना अंगावर पुरळ उठते, ती गोवरासारखी दिसते आणि त्यानंतर ताप उतरू लागतो. डेंग्यूची लक्षणे ही इतर अनेक सर्वसामान्य आजारांप्रमाणेच असल्याने सुरुवातीला फ्लू, सर्दी, मलेरिया, टायफाॅइड आदींसारखाच तो वाटतो, म्हणून डेंग्यूची साथ असताना किंवा शंका आल्यास विशिष्ट रक्तचाचण्या कराव्या लागतात. त्यानंतरच तो डेंग्यू आहे की चिकुनगुनिया, की अन्य ताप ते निश्चितपणे उमजते.
इन्फो
जिल्हा रुग्णालयातच बाधित हजारपल्याड
जिल्हा रुग्णालयाकडे गत दीड महिन्यात आलेल्या संशयित ३१२९ नमुन्यांपैकी ५७५ नमुने डेंग्यूचे बाधित आढळले असून, चिकुनगुनियाच्या १८८७ संशयित नमुन्यांपैकी ४६५ नमुने बाधित आढळून आले आहेत. म्हणजे जिल्हा रुग्णालयातील शासकीय लॅबमध्येच डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे हजारहून अधिक बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
इन्फो
खासगी रुग्णालयांमध्ये प्रचंड गर्दी
जिल्ह्यातील खासगी रुग्णालये आणि खासगी लॅबमध्ये तर डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे गत दोन महिन्यांत किमान ७ हजारांवर रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यातील पेठ, त्र्यंबकेश्वर, तसेच नाशिक तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातही मोठ्या प्रमाणात चिकुनगुनिया आणि डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरासह तालुक्यांमधील खासगी रुग्णालयेदेखील डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या रुग्णांनी ओसंडून वाहत आहेत.
कोट
जिल्ह्यात डेंग्यू आणि चिकुनगुनियाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये पुरेसा औषधीसाठा उपलब्ध आहे. मात्र, नागरिकांनी दक्षता घेण्याची गरज आहे. डासांपासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात.
डॉ. किशोर श्रीवास, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक
--------------