जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना रुजू करून घेण्यास नकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:39 AM2019-07-06T00:39:00+5:302019-07-06T00:39:19+5:30
लाच मागितल्याच्या कारणावरून फौजदारी गुन्हा दाखल झालेले जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांना रुजू करून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे.
नाशिक : लाच मागितल्याच्या कारणावरून फौजदारी गुन्हा दाखल झालेले जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी विजय डेकाटे यांना रुजू करून घेण्यास मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. डेकाटे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल असून, गेल्या महिनाभरापासून ते अनधिकृतपणे रजेवर असल्यामुळे त्यांना रुजू करून घ्यावे किंवा कसे याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
डॉ. डेकाटे यांनी आपल्याच अखत्यारितील तालुका वैद्यकीय अधिकाºयाची रजा मंजूर करून घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. या संदर्भात डेकाटे यांचे पैसे मागण्याबाबतचे संभाषण तक्रारदार वैद्यकीय अधिकाºयाने लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला सुपुर्द करून तक्रार दिली होती व त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने सापळा रचला, परंतु डेकाटे हाती लागले नाहीत, मात्र त्यांनी पैशाची मागणी केल्याचा संभाषणाचा पुरावा गृहीत धरून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने डेकाटे यांच्याविरुद्ध जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गुन्हा दाखल केला होता. या संदर्भातील कुणकुण लागल्यावर तत्पूर्वीच डेकाटे हे जून महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच किरकोळ रजेवर निघून गेले होते. साधारणत: महिनाभरानंतर दोन दिवसांपूर्वी डॉ. डेकाटे यांनी जिल्हा परिषदेत येऊन कामकाज सुरू केले व त्यांनी रजेच्या कालावधीतील रजा मंजूर करण्याबाबत प्रशासनाकडे अर्ज सादर केला होता. मात्र डेकाटे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल असून, ते विनापरवाना महिनाभर रजेवर असल्याची बाब गंभीर असल्याचे मानून जिल्हा परिषद प्रशासनाने त्यांना रुजू करून घेण्यास शुक्रवारी नकार दिला. तत्पूर्वी डेकाटे यांनी त्यांच्याच खात्यातील व्यक्तीकडे पैशाची मागणी केल्याने ते पुन्हा मूळ पदावर रुजू झाल्यास यासंदर्भातील गुन्ह्याचे पुरावे नष्ट करू शकतील. त्यामुळे गुन्ह्याची चौकशी होईपर्यंत डेकाटे यांना रुजू करून घेऊ नये, असे पत्र लाचलुचपत विभागाने जिल्हा परिषदेला दिले आहे.
पदभार सोपविला
मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी सर्व खातेप्रमुखांच्या बोलविलेल्या समन्वय आढावा समितीच्या बैठकीसाठी डेकाटे आले असता, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी त्यांना बैठकीतून बाहेर काढून दिले. डेकाटे यांच्यावर गुन्हा दाखल असल्याने त्यांच्याबाबत काय निर्णय घ्यावा तसेच विनापरवाना गैरहजर राहिल्याने त्यांना रुजू करून घ्यावे किंवा नाही याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून, डेकाटे यांचा पदभार अतिरिक्तजिल्हा आरोग्य अधिकाºयांकडे सोपविण्यात आला आहे.