चिमुकल्यांचे दात का किडतात?, पालकांनो 'अशी' घ्या मुलांच्या दातांची काळजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2022 02:35 PM2022-08-04T14:35:13+5:302022-08-04T14:35:42+5:30
नाशिक - मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमुख कारण कार्बोहायड्रेटस् अर्थात शर्करा आणि स्टार्च असलेले अन्न सातत्याने तोंडात जाते आणि तोंड ...
नाशिक - मुलांमध्ये दात किडण्याचे प्रमुख कारण कार्बोहायड्रेटस् अर्थात शर्करा आणि स्टार्च असलेले अन्न सातत्याने तोंडात जाते आणि तोंड आतून पुरेसे स्वच्छ होऊ शकत नसल्याने दात किडण्याचे प्रकार घडतात. अशा पदार्थांमध्ये दूध, सोडा, मनुका, कँडी, केक आणि ब्रेड यांचा समावेश असतो. दात किडण्यात तोंडातील थुंकीची भूमिका सर्वाधिक महत्त्वाची असते. थुंकीत आमलीय घटकांचा समावेश असेल, तर दात किडण्याची प्रक्रिया तुलनेने कमी होते, तसेच दातांची बालपणापासून योग्य निगा राखली तरी दात किडत नाहीत.
तोंडाची दुर्गंधी आणि दंतविकार
खराब दात, तसेच हिरड्यांच्या वा दातांच्या अन्य आजारांमुळे मुखदुर्गंधी निर्माण होते. कान, नाक, घशाचे विकार, डायबिटिस, उच्च रक्तदाबाच्या तक्रारीमुळेही दुर्गंधी येऊ शकते. कांदा, लसूण, मसालेयुक्त पदार्थ सातत्याने व अति प्रमाणात खाणे, दात स्वच्छ न ठेवणे, अन्नाचे कण दात आणि हिरड्यांमध्ये साचून राहणे. किडलेल्या दातांमुळे, श्वसन मार्गातील काही संसर्गामुळे तोंडाला दुर्गंधी येऊ शकते.
चॉकलेट कमी खा
दात किडणे म्हटले की त्याचे खापर सर्रासपणे चॉकलेट खाण्यावर फोडणे चुकीचे आहे. चिकट आणि गोड पदार्थांचे सेवन केले, तर त्याचे कण दातांवर आणि दातांमध्ये चिकटून राहतात. अशा पदार्थांचे सेवन केल्यानंतर तातडीने चूळ भरणे आवश्यक असते. दातांवर जर कोणत्याही कार्बोहायड्रेटस्युक्त पदार्थांचा थर साचून राहिला, तर त्यावर जिवाणू आणि कीड तयार होऊन दातांचे आरोग्य धोक्यात येते. त्यामुळे दातांचे आरोग्य राखण्यासाठी चॉकलेट आणि गोड पदार्थ कमी खाणे हेच सोयीस्कर ठरते.
दोन वेळा ब्रश करा
चॉकलेटसह गोड पदार्थ किंवा काहीही खाल्ल्यानंतर चूळ भरावी, सकाळी-रात्री ब्रश करण्याने दातांचे आरोग्य टिकून राहते.
सकाळी आणि रात्री अशा दोन्ही वेळेला दात स्वच्छ करण्याची सवय अंगीकारणे आवश्यक आहे. सकस आहारही महत्त्वाचा भाग आहे. चिकट पदार्थ खाणे शक्यतो टाळावे.
दातांची काळजी कशी घ्याल?
स्तनपान झाल्यानंतर किंवा बाटलीतील दूध पिल्यानंतर बालक झोपी जाते. त्याच्या हिरड्या स्वच्छ न केल्याने त्याच्यावर दुधाचा थर साचत जातो. परिणामी या बाळाला दात येताना ते किडलेले येण्याची शक्यता बळावते. त्यामुळे स्तनपानानंतर किंवा बाटलीतील दूध पिल्यानंतरही मऊ फडक्याने हिरड्या स्वच्छ करून घेणे आवश्यक आहे. प्रत्येक टप्प्यात दातांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येक खाण्यानंतर खळखळून चूळ आणि किमान दोन वेळा ब्रश करणे आवश्यक असते.