पुढील वर्षापासून दातांचाही विमा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2019 05:04 AM2019-12-12T05:04:55+5:302019-12-12T05:05:37+5:30
नाशिकमध्ये शुक्रवारपासून राज्य डेंटल असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे.
- धनंजय रिसोडकर
नाशिक : आरोग्य विम्यात शरीरातील प्रत्येक लहान-मोठ्या अवयवांचा समावेश असताना केवळ मौखिक आरोग्याचा विमा अर्थात दातांचा विमा काढण्याची मुभा नव्हती. मात्र, इंडियन डेंटल असोसिएशनच्या वतीने देशातील दोन विमा कंपन्यांशी त्यासंदर्भात चर्चा झाली असून, पुढील वर्षापासून दातांच्या विम्याचीही सुविधा नागरिकांना उपलब्ध होऊ शकणार आहे.
नाशिकमध्ये शुक्रवारपासून राज्य डेंटल असोसिएशनचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित करण्यात आले आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रस्तावित परिषदेचे अध्यक्ष डॉ. संजय भावसार यांच्याशी झालेल्या संवादात त्यांनी ही माहिती दिली. कोणत्याही कंपनीच्या मेडिक्लेममध्ये दातांच्या विम्याचा भाग नसतो. केवळ अपघात झाला आणि त्यात तुमचे दात पडले किंवा दातांची तुटफूट झाली तरच त्या विम्याच्या रकमेत त्यावर उपचार होतात. ही आतापर्यंतची संकल्पना असून, त्याव्यतिरिक्त दातांचा विमा किंवा भरपाई मिळण्याची कोणतीही तरतूद मेडिक्लेममध्ये नसल्याचे भावसार यांनी नमूद केले.
कॉस्मेटिक ट्रीटमेंट मानण्याची प्रथा
मुळात डेंटल ट्रीटमेंट ही जीवनावश्यक बाब न मानता ती कॉस्मेटिक ट्रीटमेंटचा भाग गणली जाते. त्यामुळे दातांवरील उपचार हे सौंदर्यासाठी अशा विपरीत व्याख्येत बसविण्यात आले असल्यामुळेच दातांचा किंवा मौखिक आरोग्याचा विमा नावाची संकल्पना अस्तित्वात येऊ शकली नव्हती. भारतातील एका आघाडीच्या विमा कंपनीने गतवर्षी तीन महिने प्रायोगिक तत्त्वावर दंत विम्याबाबतचा प्रयोग केला होता. त्यातील काही तरतुदी अयोग्य वाटल्याने त्यांनी तो विम्याचा प्रयोग तात्पुरता बाजूला ठेवला होता. मात्र, पुढील वर्षापासून ती कंपनीदेखील दंत आरोग्य विम्याबाबत सकारात्मक विचार करू शकते.