लग्नास नकार दिल्याने तरुणीची वडिलांसमोरच हत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2018 01:13 AM2018-08-01T01:13:16+5:302018-08-01T01:13:33+5:30
लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने येथे तरुणीच्या घरात शिरून तिच्या वडिलांसमोर धारदार शस्त्राने तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सदर तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठत शरणागती पत्करत गुन्ह्याची कबुली दिली.
कसबेसुकेणे : लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने येथे तरुणीच्या घरात शिरून तिच्या वडिलांसमोर धारदार शस्त्राने तिची निर्घृण हत्या केली. यानंतर सदर तरुणाने थेट पोलीस ठाणे गाठत शरणागती पत्करत गुन्ह्याची कबुली दिली. येथील राजवाडा भागात मंगळवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोनाली ऊर्फ विद्या चंद्रकांत ढेंगळे (२१) असे मृत तरुणीचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कसबे सुकेणे येथील विद्या चंद्रकांत ढेंगळे ही मंगळवारी राहत्या घरी वडिलांसोबत घरकाम करीत होती. यादरम्यान आरोपी सूरज दिगंबर चव्हाण (२८) रा. मौजे सुकेणे याने घरात घुसून धारदार शस्त्राने विद्याच्या मानेवर, डोक्यावर, पाठीवर व हातावर वार केले. या हल्ल्यात सोनालीचा जागीच मृत्यू झाला. वडिलांनी मुलीला वाचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सूरजने त्यांच्या डोक्यावर व हातावर वार केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना कसबे सुकेणेच्या सरकारी दवाखान्यात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे कसबे सुकेणेच्या राजवाडा परिसरात तणाव असला तरी शांतता आहे. अपर पोलीस अधीक्षक गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी झेंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तसेच तपासाबाबत सूचना केल्या.
गर्दीवर नियंत्रण
हल्ल्यानंतर आरोपी सूरज चव्हाण हा पोलिसांना शरण आला असून, त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर घटना प्रेमप्रकरणातून झाली असून, लग्नास नकार दिल्याने आरोपीने हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले. घटनेची माहिती मिळताच कसबे सुकेणे पोलीस आउटपोस्टचे पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे, पोलीस नाईक रामदास घुमरे, के.बी. यादव यांनी गर्दीवर नियंत्रण मिळवित पंचनामा केला.