देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती : कांदा विक्रीचे पैसे रोखीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2018 12:19 AM2018-04-25T00:19:47+5:302018-04-25T00:19:47+5:30
कांदा विक्रीचे पैसे धनादेशाऐवजी २४ तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
देवळा : कांदा विक्रीचे पैसे धनादेशाऐवजी २४ तासांच्या आत रोखीने देण्याचा निर्णय देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सभापती बापू देवरे, संचालक मंडळ, व व्यापायांनी निर्णय घेतल्यावर सोमवारी सुरू झालेल्या लिलावात कांद्याला सरासरी ५५० रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मिळाला. त्यात कांद्याचा उत्पादन खर्चदेखील निघत नसल्याची प्रतिक्रिया संतप्त शेतकºयांनी दिली. कांद्याला उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळावा, अशी मागणी तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकºयांनी केली आहे. उन्हाळी कांदा काढणीचे काम सर्वत्र सुरू असून, शेतकरी ह्याच कामात सध्या गुंतले आहेत. मजुरांची मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाल्यामुळे तयार झालेल्या कांद्याचे नुकसान टाळण्यासाठी अव्वाच्या सव्वा मजुरी देऊन कांदे काढण्याची वेळ त्रस्त शेतकºयांवर आली आहे. त्यातच कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे त्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे.
देवळा तालुक्यात कांदा काढणीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मध्यंतरी पडलेला पाऊस व वाढलेले उष्णतामान याचा फटका कांद्याला बसून उत्पादनात मोठी घट झाली आहे. कांद्याचे दर कोसळल्यामुळे शेतकरी कांदा साठवणूक करीत आहेत. यासाठी ज्या शेतकºयांकडे कांदा साठवणुकीसाठी चाळी नाहीत ते तात्पुरत्या चाळी उभारून कांदा साठवणूक करीत आहेत. आर्थिक अडचणींमुळे मिळेल त्या भावात अनेक शेतकयांना कांदा विकण्याची वेळ आली असून, त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.