कर्मचारी बाधित सापडल्यामुळे देवळा नगरपंचायतीचे कामकाज बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 10:29 PM2020-07-04T22:29:38+5:302020-07-04T23:18:09+5:30
देवळा : येथील नगरपंचायतीचा एक कर्मचारी कोरोना संक्रमित आढळल्याने सुरक्षेच्या दृष्टीने नगरपंचायतीचे कामकाज १३ जुलैपर्यंत बंद ठेवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे. नगरपंचायत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना दहा दिवस होम कॉरण्टाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, भविष्यात कोरोना रुग्णात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी व प्रशासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन नगरपंचायत प्रशासनाने केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

आतापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या तालुक्यात आठवडाभरातच २० कोरोनाबाधित रु ग्ण सापडल्यामुळे सर्वत्र काळजीचे वातावरण आहे. शहरात आतापर्यंत १५ कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. नगरपंचायतीच्या वतीने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. कोरोनाबाधित रुग्ण सापडलेले शहरातील ओमनगर, ज्ञानेश्वरनगर, नवीन रोहिदास नगर व निमगल्ली परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे.
प्रतिबंधित क्षेत्रात औषध फवारणी करण्यात आली असून, उर्वरित शहरातही औषध फवारणी करण्यात येणार आहे. प्रतिबंधित भागातील नागरिकांना आर्सेनिक अल्बम गोळ्यांचे वाटप करण्यात येत आहे. तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे, मुख्याधिकारी संदीप भोळे, पोलीस निरीक्षक सुहास देशमुख आदींनी प्रतिबंधित क्षेत्रास भेट देऊन तेथील नागरिकांना सूचना दिल्या. कोरोनासदृश लक्षणे दिसत असलेल्या नागरिकांनी त्वरित जि.प. विद्यानिकेतन येथील कोरोना केअर सेंटरमध्ये जाऊन आरोग्य तपासणी करून घ्यावी. शहरातील नागरिकांनी प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांच्या संपर्कात येऊ नये. शहरात कोरोनाचा संसर्ग इतरत्र पसरू नये यासाठी नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी.
- संदीप भोळे, मुख्याधिकारी, नगरपंचायत, देवळा