देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 12:29 PM2021-03-17T12:29:26+5:302021-03-17T12:30:05+5:30
देवळा : एक महिन्यापासून फरार असलेला देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार चंद्रकांत उर्फ गोटु देवाजी वाघ ( रा. गिरणारे, ता. देवळा ) हा मंगळवारी रात्री कळवण पोलिसांना शरण आला.
देवळा : एक महिन्यापासून फरार असलेला देवळा मुद्रांक घोटाळा प्रकरणातील मुख्य सुत्रधार चंद्रकांत उर्फ गोटु देवाजी वाघ ( रा. गिरणारे, ता. देवळा ) हा मंगळवारी रात्री कळवण पोलिसांना शरण आला. त्यामुळे तपासाला आता गती मिळाली असून ह्या प्रकरणात अनेक मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुद्रांक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी ह्या प्रकरणातील संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे दुय्यम निबंधक माधव महाले यांनी दि.१३ फेब्रुवारी रोजी दिलेल्या फिर्यादीवरून गोटु वाघ, बापू वाघ व इतर साथीदारांवर देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोन्ही संशयित आरोपी फरार झाले होते. गत सप्ताहात शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेणारा बापू रामचंद्र वाघ ( रा. झाडी, ता. मालेगाव ) याला देवळा पोलिसांनी अटक केली होती. ह्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार मुद्रांक विक्रेता चंद्रकांत उर्फ गोटू वाघ हा एक महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देत होता.त्याच्या जामीन अर्जावर दि.१६ रोजी जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार होती. तेथे जामीन न मिळाल्याने अखेर तो पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. मुद्रांक विक्रेता पोलिसांच्या स्वाधिन झाल्याने त्याला दुय्यम निबंधक कार्यालयातून जुना मुद्रांक व बनावट दस्तऐवज प्रमाणित करून त्याची सत्यप्रत काढून देण्यास, तसेच बनावट मुद्रांक बनवण्यास कुणी मदत केली? अशा अनेक प्रश्नांची उकल होण्यास मदत होणार आहे. तसेच बनावट दस्तऐवज व सत्यप्रत याद्वारे शेतजमीन परस्पर हडप करण्याच्या प्रकरणात झालेल्या आर्थिक देवाणघेवाणीचा उलगडा होणार आहे.