नाशिकच्या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास विभागीय नागरी सेवा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:21 PM2017-12-19T12:21:46+5:302017-12-19T13:21:44+5:30
नाशिक : देवळाली शहराला लागून असलेल्या वॉर्ड क्रमांक ७ मधील सोनेवाडी-अंबडवाडी परिसरास हगणदारीमुक्त केल्याने पुणे व दिल्ली येथे झालेल्या रक्षा संपदा दिनाच्या कार्यक्र मात देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डास उत्कृष्ट नागरी सेवेबद्दल विभागीय नागरी सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
दरवर्षी रक्षा संपदा दिनानिमित्ताने भारत सरकार रक्षा संपदा विभाग पुणे येथील प्रिन्सिपल डायरेक्टर डिफेन्स इस्टेट दक्षिण विभागाचा सार्वजनिक सेवांमध्ये नवीन उपक्रम राबविल्याबद्दल विभागीय नागरी सेवा पुरस्कार दिला जातो. गतवर्षी वॉर्ड क्रमांक ७ दलित समाजासह अन्य नागरिकांना हगणदारीमुक्त करण्यासाठी सुमारे २१ हजार रुपये किमतीची ५४ शौचालये उपलब्ध करून दिली. त्यात येथील उद्योगपती महाराज बिरमानी यांनी दोन लाख रुपये अर्थसाहाय्य देत उर्वरित खर्च बोर्डाने केला. त्यांच्या या कार्याची दखल घेत संरक्षण वसाहतीचे प्रिन्सिपल डायरेक्टर एल. के. पेगू यांच्या हस्ते आरोग्य अधीक्षक सतीश भातखळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. रक्षा संपदा दिनी दिल्लीत यूपीएससी अध्यक्ष प्रो. डेव्हिड आर. सिम्प्ली, पाणी व स्वच्छता मंत्रालयाचे सचिव परमेश्वरम अय्यर, यज्ञेश्वर शर्मा आदींच्या हस्ते उपाध्यक्ष दिनकर आढाव व मुख्य कार्यकारी अधिकारी विलास पवार यांना सन्मानित करण्यात आले.