फेरफार नोंदीप्रकरणी देवळालीचे मंडल अधिकारी निलंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:11 AM2021-06-19T04:11:22+5:302021-06-19T04:11:22+5:30
मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी देवळालीगावातील २७ वर्षे जुन्या जमिनीच्या फेरफार नोंदी घेताना अनेक चुका करण्यात आल्याची बाब उघडीस आली ...
मिळालेल्या माहितीनुसार तीन वर्षांपूर्वी देवळालीगावातील २७ वर्षे जुन्या जमिनीच्या फेरफार नोंदी घेताना अनेक चुका करण्यात आल्याची बाब उघडीस आली आहे. २७ वर्षांपूर्वीच्या दस्तावरून अधिकार अभिलेखात बदल करताना दस्ताची सत्यता पडताळणी करणे अपेक्षित होते. याप्रकरणात संबंधितांना नोटिसा पाठविणेदेखील गरजेचे हाेते. मात्र तलाठी व मंडल अधिकाऱ्यांनी याबाबतची कार्यवाही केलीच नसल्याचे उघड झाले आहे.
संबंधितांना नोटीस पाठविण्यात आल्याची बाब मंडल अधिकारी गांगुर्डे तसेच तलाठी हे दोघेही सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे आता या दोघांचीही चौकशी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून, त्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या निलंबनानंतर याप्रकरणी चौकशी अधिक पारदर्शकपणे होणार आहे.
--इन्फो--
जमिनीच्या फेरफार नोंदणीत अनेकदा गैरप्रकार केला जात असल्याचे तसेच संबंधितांना डावलण्यात येत असल्याचे प्रकार चर्चेत आहेत. गावपातळीवर अनेक मालमत्तांच्या फेरफार नोंदणीबाबतच्या अनेकदा तक्रारी समोर येतात; परंतु या प्रकरणात पुढे काहीही कार्यवाही होत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी आता देवळाली प्रकरणात विभागीय चौकशीचे आदेश दिल्याने अशाप्रकारे नोंदी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे.