बियाणे खरेदी करण्यापूर्वी दक्षता घ्या कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 07:18 PM2021-05-29T19:18:14+5:302021-05-30T00:01:19+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाची शेतकऱ्यांकडून पूर्व तयारी सुरु असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी व विडी (राईस) रातेचा प्रादुर्भाव इगतपुरी तालुक्यात जास्त असल्याने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
घोटी : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाची शेतकऱ्यांकडून पूर्व तयारी सुरु असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना दक्षता घ्यावी व विडी (राईस) रातेचा प्रादुर्भाव इगतपुरी तालुक्यात जास्त असल्याने शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांनी आपल्या भात पिकांची रोपे नर्सरी मध्ये रोपण करण्याआधी रातेची रोपे उपटून फेकून देण्यात यावी, जेणेकरून पेरणी नंतर त्याचा प्रादुर्भाव होणार नाही. महत्त्वाच्या पिकावर कोणते कीड-रोग येतात व त्यासाठी नवीन अद्यावत शिफारस केलेल्या कीड व रोग प्रतिकारक वाणांना बियाणे म्हणून खरेदी करताना प्राधान्य द्यावे.
तसेच कोणतेही प्रमाणित बियाणे खरेदी करताना विक्रेत्याकडून पक्की पावती घ्यावी, त्यावर बियाण्याचा प्रकार, लॉट क्रमांक, पॅकिंग किती वजनाचा आहे, पॅकिंगची तारीख, वापरण्याची अंतिम तारीख इत्यादी गोष्टी नमूद केल्या आहेत काय, याची खात्री करावी. तसेच खरेदी केलेल्या बियाण्याची पावती, बियाण्याचे रिकामे पॅकिंग ह्या गोष्टी व्यवस्थित जपून ठेवाव्यात.
बाजारात सीलबंद बियाणांच्या प्रमाणित पिशवीला दोन टॅग असतात . अशा निळ्या रंगाचा डबल लेबल पाहूनच प्रमाणित बियाणे खरेदी करावे, असेही कृषी विभागाने म्हटले आहे.
तालुक्यात शेतकऱ्यांच्या बियाण्यामध्ये भेसळीच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे पेरणीपूर्वी आपण केलेल्या नर्सरीमधील विडी (राते) यांना नष्ट केल्यास उत्पन्नात कुठल्याही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. खतेही जमीन आरोग्य पत्रिकेत शिफारशी नुसारच वापरावेत.
- शितलकुमार तवर, कृषी अधिकारी, इगतपुरी.