सामाजिक वनीकरण विभागाची शिवप्रेमींना साद; मिळवा मोफत रोपे अन् गड-किल्ल्यांवर करा वृक्षारोपण...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 07:59 PM2021-02-13T19:59:17+5:302021-02-13T20:03:29+5:30
नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली.
नाशिक : श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या औचित्यावर शिवप्रेमी युवक मित्र मंडळांनी महाराजांच्या आजुबाजुंच्या गड-किल्ल्यांवर वृक्षलागवड करुन त्यांचे संवर्धन पार पाडून पर्यावरणपुरक आगळ्यावेगळ्या पध्दतीने शिवजयंती साजरी करावी, असे आवाहन सामाजिक वनीकर विभागाकडून करण्यात आले आहे. यासाठी नाशिक येथील रोपवाटिकेतून संबंधित मंडळांना व सामाजिक संस्थांना मोफत देशी प्रजातींच्या रोपांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची महिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम यांनी दिली.
शिवरायांचे गडांवर पुर्वीप्रमाणे वृक्षराजी बहरावी आणि निसर्गाचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने सामाजिक वनीकरण विभागाने आगामी शिवजयंतीच्या औचित्यावर निसर्गसंवर्धनाकरिता शिवप्रेमींना वृक्षलागवड व संवर्धन करण्याची साद घातली आहे. ह्यवृक्षरुपी हिरवी मशाल गडावर लावूया, लाडक्या राजाचा गड हरित वृक्षांनी सजवुयाह्ण असा अनोखा उपक्रम सामाजिक वनीकरणाने हाती घेतला आहे. नोंदणीकृत मंडळ तसेच इतर सामाजिक संस्थांनी आपले मागणीपत्र पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीने सामाजिक वनीकरण विभागाच्या गंगापुररोड येथील गंगाकाठ शासकिय रोपवाटिकेत प्रत्यक्षपणे जमा करावीत. प्रत्येक मंडळाला किमान वीस रोपे मोफत पुरविली जाणार असल्याचे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. गुरुवारी (दि.१८) संध्याकाळी सहा वाजेपर्यंत रोपांचा पुरवठा सुरु राहणार आहे, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा शिवजयंती साध्या पध्दतीने साजरी होणार आहे. शिवप्रेमींकडून विधायक उपक्रमावर भर दिला जाणार आहे. हे लक्षात घेत निसर्ग संवर्धनाचा छत्रपती शिवरायांचा वसा पुढे नेण्यासाठी हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.