जायगाव ते सप्तशृंगगड पदयात्रेचे प्रस्थान
By admin | Published: October 15, 2016 12:14 AM2016-10-15T00:14:33+5:302016-10-15T01:33:13+5:30
जायगाव ते सप्तशृंगगड पदयात्रेचे प्रस्थान
नायगाव : सप्तशृंगगडावरील कोजागरी पौर्णिमा उत्सवात सहभागी होण्यासाठी सिन्नर तालुक्यातील जायगाव येथून काढण्यात आलेल्या पायी दिंडी सोहळ्याचे गुरुवारी पहाटे प्रस्थान झाले. कै. हरिभाऊ दिघोळे यांनी सुरू केलेल्या या पायी दिंडी सोहळ्याचे यंदा १९वे वर्ष आहे.
गुरुवारी पहाटे ६ वाजता हनुमान मंदिरात सरपंच नलिनी विलास गिते व माजी उपसरपंच कैलास गिते यांच्या हस्ते देवीची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. त्यानंतर पदयात्रेचे सप्तशृंगगडाकडे प्रस्थान झाले. पायी दिंडी सोहळा समितीने पदयात्रेत सहभागी भाविकांच्या भोजनाची व सामानासाठी टेम्पोची व्यवस्था केली आहे. सकाळी सिन्नर-सायखेडा रस्त्याने माळेगाव, मापारवाडी, नायगाव आदि गावांतून दिंड्यांचे प्रस्थान झाले. भाविकांच्या गर्दीमुळे रस्ता फुलून गेला होता. देवीचा जयजयकार करीत जाणाऱ्या दिंड्यांमुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते. दिंडीत भानुदास काकड, महेंद्र सांगळे, भीमा गिते, संतोष दिघोळे, सचिन दिघोळे, जगन दिघोळे आदिंसह ५० ते ६० भाविक सहभागी झाले. (वार्ताहर)