संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचे प्रस्थान
By Admin | Published: June 20, 2016 11:38 PM2016-06-20T23:38:17+5:302016-06-21T00:13:12+5:30
संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांच्या पालखीचे प्रस्थान
त्र्यंबकेश्वर : हरिनामाचा जयघोष करीत संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पालखीचे आषाढी वारीसाठी आज अपूर्व उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्यातून सुमारे ४० ते ५० हजार भाविक दाखल झाले होते. आज, सोमवारी सकाळी पावणेअकरा वाजता चांदीचा रथ निवृत्तिनाथांच्या पादुका घेऊन पंढरपूरकडे निघाला. आषाढी एकादशीच्या वारीसाठी देशातून संत-माहात्म्यांच्या दिंड्या पंढरपूरकडे कूच करीत असतात. पंढरपूर हे संतांचे माहेर आहे. संत निवृत्तिनाथांची पालखी २४-२५ दिवसांचा पायी प्रवास करीत दि. १३ जुलै रोजी पंढरपूरला पोहोचेल. टाळ-मृदंगाच्या गजरात तल्लीन पालखी निवृत्तिनाथ समाधी संस्थानपासून मार्गस्थ झाली.
कुशावर्तावर पालखी आल्यानंतर नगराध्यक्ष विजया लढ्ढा, त्यांचे पती दीपक लढ्ढा यांच्या हस्ते निवृत्तिनाथांच्या पादुकांचे पूजन करण्यात आले. या विधिवत पूजेनंतर पादुकांना कुशावर्तात स्नान घडविण्यात आले. यावेळी आरती पुष्पांजली झाल्यानंतर पादुका रथात स्थानापन्न करण्यात आल्यानंतर रथ पुढे हलविण्यात आला.
रथाचे सारथी माजी नगराध्यक्ष सुनील अडसरे, त्यांचे पुत्र अजय अडसरे बैलांना सावरीत होते. मिरवणुकीच्या शोभायात्रेत रथापुढे टाळकरी, विणेकरी-मृदंगवादक आदिचे अभंग सुरू होते. त्यापुढे तुळशी वृंदावन घेऊन असंख्य महिला होत्या. पुढे नृत्य करणारे घोडे त्यापुढे ढोलताशा, बॅण्ड पथक अशा थाटात दिंडीचे स्वरूप होते. (वार्ताहर)