संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान; मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 12:44 PM2021-06-24T12:44:25+5:302021-06-24T12:45:31+5:30
Sant Nivrutti Nath Maharaj's palkhi : गुरुवारी सकाळी धर्मदाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीची महापूजा करण्यात आली.
त्र्यंबकेश्वर (नाशिक) : यंदाही कोरोनामुळे परंपरा खंडित होऊ नये यासाठी येथील संत सदगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखी दिंडीचे प्रस्थान आज वट पौर्णिमेच्या दिवशी औपचारिकरित्या समाधी संस्थानचे प्रशासकीय विश्वस्त मंडळ आणि मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत झाले. पालखी मंदिरातच मुक्कामी राहणार आहे.
गुरुवारी सकाळी धर्मदाय सहआयुक्त जयसिंग झपाटे यांच्या हस्ते निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीची महापूजा करण्यात आली. आरती, भजन व त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळा झाला. यावेळी दिंडीचे मानकरी ह.भ.प.मोहन महाराज बेलापुरकर, ह.भ.प.बाळकृष्ण महाराज डावरे, ह.भ.प.बाळासाहेब देहुकर व महामंडलेश्वर डाॅ.रामकृष्ण महाराज लहवीतकर आदी उपस्थित होते.
संत निवृत्तीनाथांच्या पालखीचे प्रस्थान; मोजक्याच वारकऱ्यांची उपस्थितीhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/3d1tFeTZlx
— Lokmat (@MiLOKMAT) June 24, 2021
दि.१९ जुलै रोजी आषाढ शु.दशमीला परिवहन महामंडळाच्या दोन बसने पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. त्यात ४० मानाच्या दिंड्यांच्या प्रत्येकी एका प्रतिनिधीला स्थान मिळेल व प्रशासकीय विश्वस्त मंडळाचे सदस्य, विणेकरी, टाळकरी, झेंडेकरी, भालदार व चोपदार, पखवाज वादक, मानकरी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आदी बसमध्ये स्थानापन्न होतील. यावर्षी कोरोनाचा प्रभाव कमी असल्याने परिवहन महामंडळाच्या दोन बस शिवशाही बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.