वावी ते श्री क्षेत्र मढी पदयात्रेचे सोमवारी प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 05:53 PM2020-03-08T17:53:42+5:302020-03-08T17:54:35+5:30
सिन्नर : रंगपंचमीच्या दिवशी पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मढी येथे भरणाऱ्या श्री कानिफनाथ महाराज यात्रोत्सवासाठी सिन्नर तालुक्यातल्या वावी येथून पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रंगपंचमीच्या यात्रेसाठी सोमवारपासून (दि.९) पदयात्रेचे आयोजन करण्यात आहे. या पदयात्रेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
वावी गावचे आराध्य दैवत असलेल्या कानिफनाथ महाराज यांचा यात्रोत्सव श्रीक्षेत्र मढी येथे रंगपंचमीच्या दिवशी भरतो. रंगपंचमीच्या यात्रोत्सवासाठी दरवर्षी येथून होळी(धुलीवंदन) ते रंगपंचमी या काळात पदयात्रेचे आयोजन करण्यात येते. रंगपंचमीला भरणा-या यात्रेसाठी येथून सुमारे ७०० हून अधिक नाथभक्त पायी दिंडीने श्रीक्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथे जातात. येत्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत जाणाºया या पदयात्रेसाठी तयारी झाली आहे. यात्रोत्सवात सहभागी होणारा रथ सजविण्यात आला आहे. पदयात्रेसाठी युवकांमध्ये विशेष उत्साह दिसून येत आहे. सुमारे ५० वर्षांपासून परंपरेने चालत आलेल्या या रंगपंचमी सोहळ्याच्या पदयात्रेत गेल्या २० वर्षांपासून भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोणी, कोल्हार, सोनई, शनिशिंगणापूर, टाकळीमियाँ, मिरी, तिसगाव या मार्गे जाणा-या पदयात्रेत भक्त दररोज ४० किलोमीटर अंतर पायी चालतात. या पदयात्रेसोबत पिण्याच्या पाण्याचा टँकर, ट्रॅक्टर, टेम्पो आदि वाहने असतात. रविवारी (दि. ८) रोजी सकाळी ९ वाजता कोपरगाव आश्रमाचे प. पू. दत्तगिरी महाराज यांच्या हस्ते रथ, ध्वज व पालखी पूजन करण्यात आले. त्यानंतर सायंकाळी श्री कानिफनाथ महाराज रथाची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. सोमवार (दि. ९) रोजी दुपारी दिंडीचे प्रस्थान होणार आहे. रंगपंचमीच्या दिवशी श्री क्षेत्र मढी येथे भरणा-या यात्रेला लाखो भाविक हजेरी लावतात. यात्रोत्सवात वावीच्या काठीला विशेष मान असतो. वाजत गाजत मिरवणुकीने जाऊन काठीला कळसाचे दर्शन घडवून आणले जाते. या पदयात्रेच्या समितीने मढी (ता. पाथर्डी) येथे मुक्कामासाठी जागा विकत घेतली असून या ठिकाणी पायी जाणारे नाथभक्त जाऊन विसावतात. या पदयात्रा काळात तिसगाव, सोनई, टाकळीमिया आदि गावांसह गावोगावी रथपूजन करण्यात येऊन गावातून रथाची सवाद्य मिरवणूक काढण्यात काढून जल्लोषात स्वागत करण्यात येते. सोमपासून निघणा-या या पदयात्रेमुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पदयात्रेत जास्तीत जास्त भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन पदयात्रा संयोजक श्री कानिफनाथ मित्रमंडळ व ग्रामस्थांनी केले आहे.