मनसेच्या सहा महिलांची हद्पारी रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2022 01:48 AM2022-05-12T01:48:04+5:302022-05-12T01:48:28+5:30
मशिदींसमाेर हनुमान चालिसा वाजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात तडिपार करण्यात आलेल्या मनसेच्या सहा महिला पदाधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडून बुधवारी (दि.११) स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे या महिलांचा शहरात परतण्याचा मार्ग खुला झाला आहे.
नाशिक : मशिदींसमाेर हनुमान चालिसा वाजविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणात तडिपार करण्यात आलेल्या मनसेच्या सहा महिला पदाधिकाऱ्यांच्या हद्दपारीच्या आदेशाला अतिरिक्त सत्र न्यायाधीशांकडून बुधवारी (दि.११) स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे या महिलांचा शहरात परतण्याचा मार्ग खुला झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने बुधवारी (दि.४) मे राेजी मनसेच्या या महिला पदाधिकाऱ्यांनी भद्रकाली पाेलीस ठाण्याच्या हद्दीत मशिदीसमाेर घोषणाबाजी करत पहाटेच्या सुमारास हनुमान चालिसा वाजविण्याचा प्रयत्न केला हाेता. त्यामुळे भद्रकाली पाेलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या कारणास्तव महिलांना ताब्यात घेत अटक केली हाेती. त्यांना मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमाेर हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाने मनसेच्या महिला पदाधिकारी सुजाता डेरे, कामिनी दाेंदे, अक्षरा घाेडके, अरुणा पाटील, निर्मला पवार तसेच स्वागता उपासनी यांना पंधरा दिवसांसाठी शहरातून हद्दपार केले होते.
या कारवाईविराेधात महिलांनी वकिलांमार्फत वरिष्ठ न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानुसार अंतिम सुनावणीत अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही. पी. देसाई यांनी यापूर्वीच्या तडिपारी आदेशाला येत्या मंगळवारपर्यंत (दि.२४) स्थगिती दिली.