जिल्ह्यात २२९ उमेदवारांची अनामत जप्त
By admin | Published: March 9, 2017 12:44 AM2017-03-09T00:44:17+5:302017-03-09T00:44:28+5:30
जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ६७५ उमेदवारांपैकी २२९ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही.
संजय दुनबळे नाशिक
जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या १४६ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ६७५ उमेदवारांपैकी २२९ उमेदवारांना आपली अनामत रक्कमही वाचविता आली नाही. यात अपक्ष उमेदवारांबरोबरच पक्षीय उमेदवारांचाही समावेश आहे. केंद्रात आणि राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने अनामत रक्कम गमवावी लागणाऱ्या पक्षीय उमेदवारांमध्ये प्रथम क्रमांक मिळविला आहे, तर कॉँग्रेस दुसऱ्या स्थानी आहे.
निवडणूक लढण्याची हौस अनेक इच्छुकांनी भागवून घेतली. मतमोजणीपूर्वी आपलाच विजय असल्याचा छातीठोकपणे दावा करणाऱ्यांना मतमोजणीनंतर अनेकांना अनामत रक्कमही वाचविता आली नसल्याचे स्पष्ट झाले. गणामध्ये झालेल्या एकूण मतदानाच्या रकमेतून नोटाची (कुणीही नाही) मते वजा केल्यानंतर शिल्लक राहाणाऱ्या मतांपैकी एक अस्टमांश मते मिळालेल्या उमेदवारांनाच आपली अनामत रक्कम परत मिळत असते. जिल्ह्यातील अनेक उमेदवारांना एवढी मते मिळालेली नाहीत. अपक्ष उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. गणांचा विस्तार पाहाता अपक्ष उमेदवारांना सर्वत्र आपली यंत्रणा राबविणे शक्य होत नसल्याने त्याचा मतदानावर परिणाम होऊ शकतो हे एकवेळ समजण्यासारखे आहे. पक्षीय उमेदवारांकडे स्वत:च्या यंत्रणेबरोबरच पक्षाची यंत्रणा असतानाही त्यांना अनामत रक्कम वाचविण्याइतकी मते न मिळाल्यास पक्षावर नामुष्कीची वेळ येते.
जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीमध्ये एकूण ६७५ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी २२९ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. यात भाजपाच्या ३३, कॉँग्रेस २४, राष्ट्रवादी कॉँग्रेस १४, मनसे १७, शिवसेना १०, अपक्ष व इतर १३१ उमेदवारांचा समावेश आहे. अनामत रक्कम जमा होणाऱ्या उमेदवारांची तालुकानिहाय आकडेवारी पाहात त्यात निफाड तालुका आघाडीवर आहे तर देवळा आणि सुरगाणा हो दोन तालुके बरोबरीत आहे.
तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - सटाणा १३, चांदवड १५, देवळा ५, नांदगाव ११, कळवण १३, मालेगाव २७ दिंडोरी २०, निफाड २९, येवला २०, त्र्यंबक ११, पेठ १०, सुरगाणा ५, सिन्नर १५, इगतपुरी २४ , नाशिक ११ .