गुणपत्रिकेतून नापास शेरा हद्दपार करणे स्वागतार्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 12:51 AM2019-12-10T00:51:53+5:302019-12-10T00:52:14+5:30
राज्य सरकारने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘कौशल्य सेतू अभियान’ योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. परिणामी, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार होणार आहे. त्याऐवजी नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.
माझे मत
नाशिक : राज्य सरकारने अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम करण्यासाठी ‘कौशल्य सेतू अभियान’ योजना राबवण्यास मान्यता दिली आहे. परिणामी, दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ शेरा हद्दपार होणार आहे. त्याऐवजी नापास विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिला जाणार आहे.
याबाबतचा शासन निर्णय हा कौशल्य विकास व उद्योजकता विभागाने जारी केला असून, तसा प्रस्ताव राज्य शिक्षण मंडाळाकडे पाठवण्यात आला आहे. या निर्णयाचे विविध स्तरांतून स्वागत केले जात असून, हा निर्णय समाधानकारक असल्याचे मत काही मुख्याध्यापक, शिक्षकांनी व्यक्त केले आहे.
शासनाच्या या निर्णयाचे स्वागत आहे. विद्यार्थी नापास झाल्यास खचून जातो. त्यामुळे नापास ऐवजी ‘कौशल्य विकासास पात्र’ असा शेरा दिल्याने तो आपला विश्वास गमावणार नाही आणि त्याला आपल्या कौशल्यातून आपल्या पायावर उभे राहण्यास मदत होणार आहे.
- गणेश टर्ले, शिक्षक,
किमान कौशल्य विभाग
नापास झाल्यावर विद्यार्थ्यात नैराश्य निर्माण होते. मात्र या निर्णयामुळे अशा विद्यार्थ्यांना उद्योगधंद्यांकडे वळण्यासाठी एक नवी दिशा मिळणार आहे. नापास ऐवजी कौशल्य विकास पात्र या शेरामुळे त्याला कौशल्य विकास योजनेअंतर्गत असलेल्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश मिळेल व तो त्यामधून आपले आयुष्य सुकर करु शकतो. मात्र विद्यार्थ्यांनीही पास होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
- पुरुषोत्तम रकिबे, प्राचार्य, शिवाजी विद्यालय, शिंदेगाव
काही विद्यार्थी नावालाच पास होण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र नापासचा शिक्का बसल्यावर त्याला बाहेर कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश मिळत नाही. मात्र कौशल्य विकास अभियानातून त्याला आपले भविष्य नव्याने घडविण्याची संधी उपलब्ध होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे अभ्यासात कमी असलेल्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. मात्र अभ्यास करुन चांगले गुण मिळविण्याचाही प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला पाहिजे.
- अरुण पवार, मुख्याध्यापक, मराठा हायस्कूल
सरकारच्या या निर्णयाचे स्वागत आहे. नापास झाल्यावर बऱ्याचदा विद्यार्थ्यी नैराश्याच्या गर्तेत जातात. कौशल्य विकासमुळे त्याला कलेला चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. मुलांमध्ये अनेक कौशल्य असतात मात्र विज्ञान, गणिताच्या चौकटीत त्यांना याकडे लक्ष देता येत नाही.
- एस. बी. देशमुख, सचिव,
जिल्हा मुख्याध्यापक संघ
काय आहे कौशल्य सेतू अभियान?
कौशल्य सेतू अभियानामध्ये दहावी व बारावी अनुत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींना जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. संपूर्ण राज्यात अशी १११ प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असून यामध्ये ‘नॅशनल स्कील डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन’ अंतर्गत ‘यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स’ व ‘नॅशनल युवा कोआॅपरेटिव्ह सोसायटी’ या दोन संस्थांच्या माध्यमातून सहा महिने कालावधीसाठी प्रशिक्षण देण्यात येते. यात मोबाइल रिपेअरिंग, असिस्टंट इलेक्ट्रिशियन, आॅटोमोबाइल सर्व्हिस टेक्निशियन, मॅन्युअल मेटल आर्क वेल्डिंग, डीटीएच सेट टॉप बॉक्स इन्स्टॉलेशन अँड सर्व्हिस टेक्निशियन अशा ९०० कौशल्य विकास अभ्यासक्र मांच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश दिला जातो. प्रॅक्टिकल ट्रेनिंगवर भर असलेले हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात येते.