निर्यात केंद्रासह शाश्वत बाजारपेठेबाबतची उदासीनता ठरतेय प्रगतीत अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:48+5:302021-09-10T04:19:48+5:30
नितीन बोरसे लोकमत न्यूज नेटवर्क सटाणा : बागलाण हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा तालुका आहे. अर्ली द्राक्ष आणि डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन ...
नितीन बोरसे
लोकमत न्यूज नेटवर्क
सटाणा : बागलाण हा प्रयोगशील शेतकऱ्यांचा तालुका आहे. अर्ली द्राक्ष आणि डाळिंबाचे दर्जेदार उत्पादन काढून सातासमुद्रापार निर्यात करून जगाच्या नकाशावर बागलाणची नवी ओळख निर्माण करून तर दिलीच परंतु देशाला कोट्यवधी रुपयांचे परकीय चलन देखील मिळवून दिले. असे असताना शासनाची मात्र निर्यात केंद्र व शाश्वत बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासोबतच डाळिंबावरील तेल्या रोगाचा नायनाट करणाऱ्या औषधाचे संशोधन करण्यासंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. शासनाने या सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने सुगीचे दिवस येतील.
बागलाण हा तसा नैसर्गिक साधनसंपत्तीने समृद्ध तालुका आहे. सह्याद्री डोंगररांगा याच भागातून आहेत. भौगोलिक क्षेत्र आणि पोषक हवामानाचा अंदाज घेत या तालुक्यातील शेतकरी निरनिराळे प्रयोग करीत असतो. दोन दशके डाळिंब पिकाची सर्वाधिक लागवड होती. ३५ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र डाळिंब पिकाने तर अडीच हजार हेक्टर क्षेत्र अर्ली द्राक्ष पिकाने व्यापले होते. या पिकाने खऱ्या अर्थाने येथील शेतकऱ्यांना लक्ष्मी दर्शन दिले. या भागातील शेतकऱ्याने अन्य भागातील शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम केले. मात्र, दरम्यानच्या काळात या पिकाला दृष्ट लागली. तेल्यासारख्या महाभयंकर रोगाने डाळिंब पिकावर आक्रमण केले. शासनाने अनेक संस्थांकडून या रोगाच्या उच्चाटनासाठी सर्व पातळीवर संशोधन झाले. मात्र, तेल्या रोगाने डाळिंबाचे आगार उद्ध्वस्त झाले. शेतकरी कर्जबाजारी झाला तरी त्यावर आजही उपाय सापडू शकला नाही ही शोकांतिका आहे. डाळिंबाला पर्याय म्हणून बागलाणच्या शेतकऱ्याने अर्ली द्राक्षाला पसंती दिली. सुरुवातीला या पिकाने बऱ्यापैकी हात दिला. परंतु, कधी अतिवृष्टी, गारपीटसारख्या अस्मानी संकटाने दगा दिला तर कधी व्यापाऱ्यांनी गंडा घातला अशा दुहेरी संकटाने पिच्छा न सोडल्याने पुन्हा या भागातील शेतकरी डाळिंब पिकाकडे वळला आहे. आजच्या घडीला १५ हजार हेक्टर क्षेत्रावर डाळिंब लागवड आहे. त्यापैकी ७ हजार हेक्टर क्षेत्रावर नव्याने लागवड झाली आहे.
तेल्यावर संशोधनाची गरज
आजच्या घडीला डाळिंब पीक बागलाणचे मुख्य पीक आहे. शेतकरी पोटच्या गोळ्यासारखी या पिकाची जतन करतात. हजारो रुपये खर्च करून बहार घेतो. मात्र, हातातोंडाशी आलेल्या पिकावर तेल्या आक्रमण करून घास हिरावून घेतो. यामुळे शेतकरी अधिक आर्थिक संकटाच्या खाईत लोटला जातो. शासनाने शेतकऱ्याच्या पसंतीला उतरलेल्या या पिकाला वाचविण्यासाठी तेल्यासारख्या रोगाचा नायनाट करण्यासाठी संशोधन होणे आवश्यक आहे. मात्र, याबाबत शासन उदासीन दिसत आहे. शासनाने लखमापूर येथे डाळिंब संशोधन केंद्र उभारले आहे. मात्र, त्याच्यात काय संशोधन केले जाते हा संशोधनाचा विषय बनला आहे.
निर्यात केंद्र उभारण्याची गरज...
बागलाणच्या अर्ली द्राक्ष आणि डाळिंबाने आखाती आणि युरोपीय देशांना भुरळ घातली आहे. परकीय चलन मिळवून देणाऱ्या या पिकांसाठी निर्यात केंद्र उभारण्याची आवश्यकता आहे. कोल्ड स्टोरेज तयार केल्यास या फळाच्या निर्यातीला चालना मिळून शेतकऱ्याच्या पदरात दोन पैसे पडतील. मात्र, शासनाच्या उदासीन धोरणामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
उन्हाळ कांदा पीक घेण्यातही अग्रेसर..
बागलाण तालुक्यात उन्हाळ कांदादेखील मोठ्या प्रमाणावर घेतला जातो. दरवर्षी सुमारे आठ हेक्टर क्षेत्रावर उन्हाळ कांद्याची लागवड केली जाते. मंदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू नये म्हणून शासनाने कांदा चाळ योजना सुरू केली आहे. कांदा साठवण व्यवस्था प्रत्येक शेतकऱ्याने शासनाचे कांदा चाळ अनुदान किंवा स्वखर्चाने कांदा चाळ उभारून केली आहे. तालुक्यात तब्बल साडे सहा हजार कांदा चाळी उभारण्यात आल्या आहेत. या भागातील कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी पसंती आहे. या तालुक्यात ॲग्रो प्रोड्युसर कंपन्या निर्माण झाल्याने कांद्यावर प्रक्रिया करणारे उद्योगही सुरू झाले आहेत. त्यामुळे कांदा पिकासाठी ही जमेची बाजू आहे.